‘भोगावती’ पात्राचे सर्वेक्षण सुरू
By Admin | Updated: August 19, 2015 00:00 IST2015-08-19T00:00:22+5:302015-08-19T00:00:22+5:30
उस्मानाबाद : शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदीचे पात्र खोलीकरण करण्यासाठी आणि नदी सौंदर्यासाठी आता उस्मानाबादकरांनीही पुढाकार घेतला आहे.

‘भोगावती’ पात्राचे सर्वेक्षण सुरू
उस्मानाबाद : शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदीचे पात्र खोलीकरण करण्यासाठी आणि नदी सौंदर्यासाठी आता उस्मानाबादकरांनीही पुढाकार घेतला आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने काही महिन्यांपूर्वी सुरु झालेली ही मोहीम आता लोकसहभागाने अधिक वेग घेणार आहे. नदीचे सौंदर्य जपले जावे, यासाठी नगरपालिका प्रशासनाने आवश्यक उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून नदी पात्राच्या खोलीकरणाच्या अनुषंगाने प्राथमिक सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे.
भोगावती नदी पात्राची जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोमवारी सकाळी पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी नगरपालिका व तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नदी पात्र खोलीकरण आणि सौंदर्यीकरणासंदर्भात सूचना केल्या. शहराच्या ज्या भागातून ही नदी वाहते, त्याच्या दोन्ही बाजूच्या नागरिकांनीही आपल्या लगतचे हे पात्र सुंदर असावे, यासाठी पुढाकार घ्यायला हवा. नदीपात्रात कचरा तसेच सांडपाणी येणार नाही, याची व्यवस्था नगरपालिकेने करुन पात्र स्वच्छ होईल, यादृष्टीने कार्यवाही करावी. मुळात शहरातील कचरा व्यवस्थापन केले तर नदीपात्र अस्वच्छ होणे बऱ्याच अंशी कमी होईल, त्यामुळे शहरातील कचरा दररोज उचलला जाईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी नगरपालिकेला दिले. घंटागाड्यांच्या माध्यमातून नियमित कचरा उचलला जातो की नाही, हे पाहण्यासाठी तहसील कार्यालयाकडून स्वतंत्र पथक नेमण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या सुविधांमुळे दैनंदिन कचरा संकलन होऊन नदीपात्रातही कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होईल. ज्या ठिकाणी नागरिक नदीपात्रात कचरा टाकतात, तेथील भाग बंदिस्त करावा. शहरातील प्लास्टिक बंदी मोठ्या प्रमाणात राबवावी, फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन तयार करावे, ही कार्यवाही तात्काळ करावी असे त्यांनी स्पष्टपणे बजावले. नदीपात्र सौंदर्यीकरणासाठी शहरातील विविध मान्यवर पुढाकार घेतात. ही गोष्ट कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर विविध युवा मंडळे, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांनीही पुढे येऊन आपापल्या भागात ही सौंदर्यीकरण मोहीम राबवावी. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड लागणारच आहे. नगरपालिका प्रशासनानेही लोकसहभागातून शहराच्या प्रत्येक भागात अशा प्रकारची कामे हाती घ्यावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्या. दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून नदी पात्राचे खोलीकरण करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने मंगळवारी प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजपाचे धनंजय शिंगाडे, नगररचनाकार काकडे, नायब तहसीलदार राजेश जाधव, मंडळ अधिकारी संभाजी चौरे, नगर अभियंता भारत विधाते आदी उपस्थित होते.