नृत्याच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत
By Admin | Updated: May 3, 2016 01:09 IST2016-05-03T00:48:08+5:302016-05-03T01:09:39+5:30
औरंगाबाद : सततच्या पडणाऱ्या दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. याच धर्तीवर सामाजिक बांधिलकी

नृत्याच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत
औरंगाबाद : सततच्या पडणाऱ्या दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. याच धर्तीवर सामाजिक बांधिलकी जपत देवमुद्रा संस्थेच्या वतीने जागतिक नृत्य दिनाचे औचित्य साधून एका नृत्यमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाद्वारे अनेक दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला.
तापडिया नाट्यमंदिरात नुकतेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक दुष्काळग्रस्त शेतकरी त्यांच्या कुटुंबियांसह उपस्थित होते. या शेतकऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन या अनोख्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. शास्त्रीय नृत्यासोबतच ‘महारंग’ या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्राच्या लोककला रसिकांसमोर सादर करण्यात आल्या. ‘विठ्ठल तुकयाचा’ हा कार्यक्रम रसिकांना आवडला. यामध्ये भरतनाट्यम् या नृत्यप्रकारातून संत तुकारामांचे विविध अभंग साकारण्यात आले. तुकारामांचे अभंग भरतनाट्यम् स्वरूपात पाहणे रसिकांसाठी नावीन्यपूर्ण होते. संस्थेच्या संचालिका व्ही. सौम्यश्री यांनी या कार्यक्रमात प्रमुख भूमिका साकारली. नृत्य आणि अभिनय यावर आधारलेला हा कार्यक्रम रसिकांना विशेष आवडून गेला.
या कार्यक्रमाची संकल्पना, मांडणी आणि सूत्रसंचालन रामदास पवार यांनी केले. नृत्यदिग्दर्शन व्ही. सौम्यश्री यांचे होते. शीतल क्षोत्रीय, रोहिणी पिंपळे यादव, प्रशांत त्रिभुवन यांनी नृत्य दिग्दर्शनात सहाय्य केले. रंगभूषा व वेशभूषा सई घाडगे व तृप्ती कुर्ले यांची होती. अॅड. मुक्तेश्वर खोले यांचे कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.
ऐश्वर्या नवले, चैत्राली दाभोळकर, वेदांगी हिसवनकर, प्रज्ञा कुर्ले, छाया अशर यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.