मराठवाड्यात ४८४ टँकरने पाणीपुरवठा
By Admin | Updated: June 8, 2014 01:14 IST2014-06-08T01:08:58+5:302014-06-08T01:14:57+5:30
औरंगाबाद : जून महिना सुरू झाला असला तरी पावसाअभावी मराठवाड्यातील पाणीटंचाई कायम आहे.

मराठवाड्यात ४८४ टँकरने पाणीपुरवठा
औरंगाबाद : जून महिना सुरू झाला असला तरी पावसाअभावी मराठवाड्यातील पाणीटंचाई कायम आहे. उलट दिवसागणिक ही टंचाई आणखी तीव्र होत आहे. त्यामुळे विभागात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या मागील आठवड्याच्या तुलनेत ७२ ने वाढून ४८४ झाली आहे.
मराठवाड्यात यंदाही जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विशेषत: औरंगाबाद आणि बीड या दोन जिल्ह्यात मागील चार महिन्यांपासून अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे; परंतु आता जवळपास सर्वच जिल्ह्यात टंचाईने तीव्र स्वरूप धारण केले आहे. परभणी वगळता सातही जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत विभागात एकूण सहाशे गावांना ५८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक २१० टँकर सुरू आहेत. तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी एक टँकर सुरू आहे. परभणी जिल्ह्यात अद्याप एकही टँकर सुरू करण्याची गरज भासलेली नाही.
विहिरींचे अधिग्रहण
टंचाई निवारणासाठी प्रशासनाने अनेक गावांत विहिरींचे अधिग्रहण केले आहे. विभागात सद्य:स्थितीत एकूण ८९४ खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३३६ विहिरी अधिग्रहित केल्या गेल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात २५७, जालना जिल्ह्यात २६, हिंगोली जिल्ह्यात १२, नांदेड जिल्ह्यात ४७, लातूर जिल्ह्यात ६२ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १५४ विहिरींचे अधिग्रहण झाले आहे.
या विहिरींमधून गावकऱ्यांना त्यांच्याच परिसरात पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मागील आठवड्यात विभागात ७०५ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. चालू आठवड्यात त्यात १८९ विहिरींची भर पडली आहे.