पुरवठाधारक काळ्या यादीत

By Admin | Updated: May 22, 2014 00:31 IST2014-05-22T00:29:27+5:302014-05-22T00:31:38+5:30

नांदेड :वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा न करणार्‍या दोन पुरवठादारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाने तयार केला आहे़

The suppliers in the black list | पुरवठाधारक काळ्या यादीत

पुरवठाधारक काळ्या यादीत

नांदेड :जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्यावतीने मागासवर्गींयांसाठी राबविण्यात येणार्‍या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा न करणार्‍या दोन पुरवठादारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाने तयार केला आहे़ यात नाशिकसह नांदेडमधील एका पुरवठादाराचा समावेश आहे़ जि़ प़ समाजकल्याण विभागाच्यावतीने २०१३-१४ या आर्थिक वर्षात मागासवर्गीयांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभच दिला नाही़ याबाबत समाजकल्याण समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत समिती सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर कारवाईला वेग आला आहे़ याबाबतची कार्यवाही पूर्वीच सुरू झाली होती असे समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांनी सांगितले़ २०१३-१४ मध्ये मागासवर्गीयांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ६० लाखांच्या निधीची तरतूद केली होती़ जि़ प़ सेस निधीच्या २० टक्के रक्कम समाजकल्याण विभागात मागासवर्गीयांच्या योजनांसाठी राबविण्याचे शासनादेश आहेत़ मात्र या आदेशाप्रमाणे समाजकल्याण विभागाला निधी उपलब्ध होत नाही़ अपंगाच्या योजनांसाठीही शासनाने निधीबाबतचे धोरण निश्चित केले आहे़ मात्र या धोरणाला नांदेड जिल्हा परिषदेने कोलदांडाच दिला आहे़ मागासवर्गीय, अपंगासाठी योजना राबविण्याबाबत प्रचंड उदासिनता दिसत आहे़ याचा फटका जि़ प़ पदाधिकार्‍यांसह जि़ प़ सदस्यांवरील नाराजीत दिसून येत आहे़ जिल्हा परिषदेने वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी २०१३-१४ मध्ये ६० लाखांच्या निधीतून ३० लाख रूपये सायकलसाठी तर ३० लाख रूपये शिलाई मशीनसाठी निश्चित केले होते़ या साहित्याची पुरवठादारांना आॅर्डरही दिली होती़ मात्र त्या पुरवठादारांकडून आजही साहित्य पुरवठा झाला नाही़ परिणामी मागासवर्गीय योजनांपासून वंचित राहत आहेत़ शिलाई मशीनची आॅर्डर ही नाशिकच्या तर सायकलची आॅर्डर ही नांदेडच्या एका पुरवठादारास दिली होती़ त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे अधिकारी जिल्हा परिषदेला नसले तरी या दोन्हीही पुरवठादारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचे काम जिल्हा परिषदेच्या हातात आहे़ त्यानुसार ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचे समाजकल्याण अधिकारी खमीतकर यांनी स्पष्ट केले़ दुसरीकडे मागावर्र्र्गीयांच्या योजनांसाठी समाजकल्याण विभागाकडून अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप समाजकल्याण समिती सदस्य रमेश सरोदे यांनी केला आहे़ जि़ प़ ने २०१२-१३ आणि २०१३-१४ या दोन वर्षात वैयक्तिक लाभांच्या योजनांपासून मागासवर्गीयांना वंचित ठेवले आहे़ इतकेच नव्हे तर मागासवर्गीयांचा निधी इतर विभागाकडे वर्ग केल्याचा आरोपही केला आहे़ याबाबत त्वरीत कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा सरोदे यांनी दिला आहे़ यासंदर्भात संबंधितांविरूद्ध कारवाई करावी अशी मागणी सरोदे यांच्यासह समिती सदस्य वर्षाताई भोसीकर यांनी केली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The suppliers in the black list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.