सुनील केंद्रेकर विभागीय आयुक्तपदी; सेवानिवृत्तीला २० दिवस राहिलेले असतानाच भापकरांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 18:59 IST2019-02-09T18:58:12+5:302019-02-09T18:59:37+5:30
सुनील केंद्रेकर हे नवे विभागीय आयुक्त असतील.

सुनील केंद्रेकर विभागीय आयुक्तपदी; सेवानिवृत्तीला २० दिवस राहिलेले असतानाच भापकरांची बदली
औरंगाबाद : विद्यमान विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या सेवानिवृत्तीला २० दिवस राहिलेले असतानाच त्यांची पुणे येथे क्रीडा आयुक्त पदावर शुक्रवारी शासनाने बदली केली. सुनील केंद्रेकर हे नवे विभागीय आयुक्त असतील.
सेवानिवृत्तीची तारीख जवळ आल्यामुळे भापकर पदभार सोडणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. केंद्रेकर केव्हा रुजू होणार, याबाबत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. इकडे डॉ.भापकर यांच्याशीही संपर्क झाला नाही. मात्र बदली झाल्याची आॅर्डर विभागीय आयुक्त कार्यालयास प्राप्त झाल्याची माहिती आहे.
गेल्या वर्षी ३ फेबु्रवारी २०१८ मध्ये शासनाने डॉ.भापकरांची पशुसंवर्धन खात्यात सचिवपदी बदली करून केंद्रेकर यांची विभागीय आयुक्तपदी बदली केली होती. ४ फेबु्रवारी रोजी त्यांची बदली रद्द झाली होती. वर्ग-२ जमिनीच्या प्रकरणातून भापकर यांच्यावर तत्कालीन उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी १ कोटी रुपये मागितल्याची व अॅट्रॉसिटीची तक्रार केली होती. त्या प्रकरणातून बदली झाल्याची चर्चा होई. त्यामुळे पूर्ण क्षमतेने भापकरांनी बदली रोखण्यात यश मिळविले होते. त्यावेळीही केंद्रेकर रुजू होण्याच्या तयारीत असताना त्यांची बदली रद्द करण्यात आली होती.
१ जानेवारी २०१७ रोजी डॉ.भापकर यांनी आयुक्तपदाची सूत्रे घेतली होती. निवृत्तीपूर्वी ऐच्छिक ठिकाणी बदलून जाण्याची मुभा शासनाकडून मिळते. त्यानुसार डॉ.भापकर आयुक्तपदी बदलून आले होते. आता त्यांना सेवेतून निवृत्त होण्यासाठी २० दिवस राहिलेले असताना त्यांची बदली झाली.
केंद्रेकरांची औरंगाबादेत सेवा
केंद्रेकर यांनी औरंगाबादेत विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त या पदावर काम केले. त्यानंतर त्यांची कृषी आयुक्त पुणे या पदावर बदली झाली. नंतर क्रीडा विभागात बदली झाली. दोन वर्षांत विभागीय आयुक्तपदी बदली होण्याचा प्रकार त्यांच्या बाबतीत घडला आहे.
लोकसभेसाठी भापकरांचे नाव
डॉ.भापकर लोकसभा निवडणूक लढविण्याची चर्चा दीड वर्षापासून सुरू आहे. त्या चर्चेला बदलीमुळे पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे. भाजप किंवा काँग्रेसकडून उमेदवार म्हणून भापकर यांचे नाव चर्चेत येत राहिले.