रविवारचा बाजार वाहतुकीच्या मुळावर
By Admin | Updated: January 3, 2016 23:55 IST2016-01-03T23:29:17+5:302016-01-03T23:55:34+5:30
जालना: शहरातील रेल्वेस्थानक परिसरात गत काही वर्र्षांपासून रविवारचा भाजीपाला बाजार भरतो. मात्र, या बाजाराचे कोणतेच नियोजन नसल्याने

रविवारचा बाजार वाहतुकीच्या मुळावर
जालना: शहरातील रेल्वेस्थानक परिसरात गत काही वर्र्षांपासून रविवारचा भाजीपाला बाजार भरतो. मात्र, या बाजाराचे कोणतेच नियोजन नसल्याने वाहतुकीबरोबरच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. रविवारीही शेकडो वाहनचालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला.
आठवडी बाजाराच्या धरतीवर गत दोन वर्षांपासून हा बाजार भरत आहे. या बाजारात ताजा भाजीपाला मिळत असल्याने नागरिकांचाही या बाजाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु या बाजारामुळे वाहतुकीसह अनेक समस्या निर्माण होत आहे. यात सर्वांना भेडसावणारी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बाजारामुळे हा रस्ता बंद असतो. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प होते. यात रेल्वेस्थानकाला जोडणारा हा मार्ग असल्याने शेकडो दुचाकी, रिक्षा, कार तसेच इतर वाहनांची येथून वर्दळ असते. मात्र गत दोन वर्षांपासून ही समस्या सुटण्यासाठी कोणत्याही विभागाने पुढाकार घेतला नाही. नगर पालिकेकडूनही या बाजाराला अधिकृत परवानगी नसल्याचे सांगितले जाते. जामवाडी, वाघ्रूळ, नेर, इंदेवाडी, अंतरवाला, दावलवाडी, निधोना, माळशेंद्रा आदी गावातील शेकडो शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. बाजार भरल्यापासून वाहतुकीची गंभीर समस्या भेडसावते. बहुतांश बाजारकरू रस्त्याच्या कडेला बसत नाही. रस्त्याच्या अलिकडे आपली दुकाने थाटतात. यामुळे वाहतूक कोंडी वाढत असल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले. व्यापाऱ्यांनी दुकाने योग्य अंतरावर लावल्यास वाहतूक समस्या सुटू शकते. बाजार भर रस्त्यावर भरत असल्याने पालिकेकडूनही कोणती उपाययोजना केली जात नाही. नगर पालिकेने या बाजारासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.