तरूण शेतक-याची भांडेगावात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 23:48 IST2017-11-29T23:48:40+5:302017-11-29T23:48:46+5:30
भांडेगाव येथील तरूण शेतकरी बाबासाहेब दिवाण वेताळ (२८) यांनी मंगळवारी रात्री झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबासाहेब घरी का आला नाही म्हणून लहान भाऊ रामेश्वर व राहुल यांनी शेतात जाऊन बघितले असता त्यांना बाबासाहेबने गळफास घेतल्याचे दिसले.

तरूण शेतक-याची भांडेगावात आत्महत्या
खुलताबाद : भांडेगाव येथील तरूण शेतकरी बाबासाहेब दिवाण वेताळ (२८) यांनी मंगळवारी रात्री झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
बाबासाहेब घरी का आला नाही म्हणून लहान भाऊ रामेश्वर व राहुल यांनी शेतात जाऊन बघितले असता त्यांना बाबासाहेबने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी उपसरपंच अविनाश वेताळ, पोपट वेताळ, बबन वेताळ यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यांनी धाव घेऊन बाबासाहेबला गदाना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉ. विवेक चव्हाण यांनी तपासून मृत घोषित केले. बाबासाहेबचे वडील दिवाण वेताळ हे गेल्या साडेपाच वर्षांपूर्वी हृदयविकाराने मरण पावले. घरातील मोठा व्यक्ती असल्याने बाबासाहेबवर कुटुंब प्रमुखांची जबाबदारी होती. मयत बाबासाहेबकडे वडिलोपार्जित चार एकर कोरडवाहू जमीन आहे. सततच्या नापिकीमुळे त्यांचे उत्पन्नच घटले व त्यांच्या घरात नऊ सदस्य असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यात बहिणीच्या लग्नाची चिंता होती. या सर्व चिंतेतून बाबासाहेबने आत्महत्या केली. बाबासाहेबला दोन मुले असून दोन्ही अंगणवाडीत शिकतात. पो.कॉ. देवरे, चव्हाण, तलाठी प्रभाकर चव्हाण व प्रकाश बंड यांनी पंचनामा केला.