साखरेची चव झाली कडू
By Admin | Updated: May 19, 2014 00:18 IST2014-05-19T00:02:25+5:302014-05-19T00:18:21+5:30
किनवट : तालुक्यातील १९८ स्वस्त धान्य दुकानातून गेल्या पाच महिन्यांपासून स्वस्त दरात मिळणारी साखर मिळालीच नसल्याने
साखरेची चव झाली कडू
किनवट : तालुक्यातील १९८ स्वस्त धान्य दुकानातून गेल्या पाच महिन्यांपासून स्वस्त दरात मिळणारी साखर मिळालीच नसल्याने २७ हजार ९ शिधापत्रिका धारकांना खुल्या बाजारातून महागडी साखर विकत घ्यावी लागत आहे़ त्यामुळे गोरगरीब आदिवासींना गोड साखर कडू लागत आहे़ १४ रुपये प्रतिकिलो दराने मिळणारी साखर स्वस्त धान्य दुकानात जानेवारी २०१४ पासून आलीच नाही़ परिणामी ३४ रुपये प्रतिकिलो दराने खुल्या बाजारातून विकत घ्यावी लागत आहे़ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी किनवट या आदिवासी तालुक्यात १९८ स्वस्त धान्य दुकाने कार्यान्वित असून बीपीएल योजनेचे १२ हजार ३ व अंत्योदय योजनेच १५ हजार ६ कार्डधारक आहेत़ तसेच ११ हजाराच्या वर एपीएलचे कार्डधारक आहेत़ बीपीएल व अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका धारकांना प्रतिकार्ड दोन किलो साखर दिली जाते़ खरे तर एका कुटुंबाला महिन्याकाठी चार-पाच किलो साखर लागते़ पण स्वस्त धान्य दुकानातून केवळ दोन किलो साखर देवून बोळवण केली जाते़ त्यातही पाच महिन्यापासून म्हणजे जानेवारी २०१४ पासून स्वस्त दराची साखर आलीच नाही़ गेल्या काही वर्षापासून स्वस्त धान्य दुकानातून धरसोड पद्धतीने साखरेचे वाटप होत असल्याने स्वस्त दरात साखर देण्याची शासनाची इच्छा नसावी काय, म्हणून की काय गोरगरीबांना खुल्या बाजारातून साखर खरेदी करावी लागत असल्याने ती गोड न लागता कडूच लागत आहे़ याबाबत तहसीलचे पुरवठा अधिकारी म़ अजीमोद्दीन यांना विचारले असता प्रत्येक बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकार्यांच्या निदर्शनास ही बाब आणून चर्चा होत आहे़ शासनाकडूनच साखरेचा पुरवठा नसल्याने स्वस्त धान्य दुकानातून साखरेचे वाटप जानेवारीपासून नसल्याचे म़अजीमोद्दीन यांनी सांगितले़ (वार्ताहर) असा बसतो खिशाला फटका दर महिन्याला २७ हजार ९ शिधापत्रिका धारकांसाठी ५४० क्विंटल साखर येते़ त्या साखरेची विक्री प्रतिकिलो १४ रुपये दराने करण्याचे स्वस्त धान्य दुकानदारांना निर्देश आहेत़ पाच महिन्यापासून स्वस्त दराची साखर मिळतच नसल्याने प्रतिकिलो २० रुपये जास्तीची रक्कम देवून गोरगरीब शिधापत्रिका धारकांना खुल्या बाजारातून मिळवावी लागत असल्याने गोरगरिबांच्या खिशाला जणू फटकाच बसत आहे़