डिलरच्याच घशात जाते साखर
By Admin | Updated: August 20, 2014 01:53 IST2014-08-20T01:46:11+5:302014-08-20T01:53:36+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड स्वस्त धान्य दुकानावरील साखर व इतर स्वस्त धान्य गोरगरीबांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाची एक स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे़ तर हेच धान्य लंपास करणारी

डिलरच्याच घशात जाते साखर
व्यंकटेश वैष्णव , बीड
स्वस्त धान्य दुकानावरील साखर व इतर स्वस्त धान्य गोरगरीबांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाची एक स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे़ तर हेच धान्य लंपास करणारी दुसरी यंत्रणा जिल्ह्यात सक्रीय असल्याने स्वस्त धान्याचा काळा बाजार सर्रास सुरू आहे़ हे वास्तव बीड जिल्ह्यात अनेक वर्षापासून सुरू आहे़ सणाच्या निमित्ताने आलेली साखर मोठ-मोठ्या डिलरच्या घशात घालण्यासाठी नवनविन फंडे राबविले जात असल्याचे सुत्रांची सांगितले़
अन्न सुरक्षा योजने अंतर्गत दोन रूपये किलोने गहू व चार रूपये किलोने तांदूळ यासह इतर भरड धान्य गोरगरीब जनतेला स्वस्तात मिळावे यासाठी शासन प्रयत्न करते. पुर्वी आलेली साखर अथवा इतर स्वस्त धान्य डिलर मार्फत वितरित केले जात होते़ मात्र आता स्वस्त धान्य दुकानदारांनी थेट शासकीय गोदामातूनच साखर उचलायची आहे़ यामुळे आलेल्या साखरेचा काळा बाजार करण्याचे विविध फंडे वापरले जात आहेत़ यामध्ये दहा ते पंधरा स्वस्त दुकानदार एकत्र येऊन पुर्वीच्या डिलरकडे जाऊन त्यांना परमीट देत आहेत़ यामुळे गोरगरीबांसाठी आलेले स्वस्त धान्य खुल्या बाजारातील धनदांडग्या व्यापाऱ्यांच्या घशात जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीड व परळी सोडता जिल्ह्यातील इतर तालुक्यातील साखरेचे ९० टक्केच्या जवळपास वाटप झालेले आहे. प्रत्यक्ष मात्र बहुतांश गावात साखरेचा पुरवठा झालेला नाही.
२०१३ च्या दिवाळीतच आमच्या गावाला साखर आली होती. अशा प्रतिक्रीया ग्रामीण भागातील नागरिकांनी दिल्या. पोळ्याचा सण आवघ्या चार दिवसावर आलेला असताना देखील इतर भरड धान्याचे वाटप झालेले नाही़ यामुळे बीड जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांना महागामोलाचे (साखर व इतर भरड धान्य) खरेदी करावे लागणार असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे़
प्रशासनाने अन्नपुर्णा योजनेचा नुसताच गाजावाजा केला आहे़ अद्याप पर्यंत अन्नपर्णा योजनेचे धान्य गोरगरीबांपर्यंत पोहोचले नसल्याचे सुत्रांनी सांगितले़ यामुळे सणाला लाभधारकांना स्वस्तधान्य मिळेल याची शाश्वती नाही. असे चित्र पहावयास मिळत आहे.
आॅगस्ट २०१४ साठी साखरेचे मंजूर नियतन (क्विटंलमध्ये)
बीड १८८८
गेवराई ११२६
माजलगाव ४३०
अंबाजोगाई ५१५
केज ८७८
पाटोदा ३९८
आष्टी ७०२
धारूर ५३१
परळी ७८३
वडवणी ३४३
शिरूर ४४४