कारवर अचानक कोसळले झाड

By Admin | Updated: July 20, 2014 01:01 IST2014-07-20T00:58:17+5:302014-07-20T01:01:38+5:30

औरंगाबाद : मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघालेल्या कारवर एन-५, टाऊन सेंटर परिसरातील गुलमोहराचे भलेमोठे झाड मुळापासून कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.

The sudden collapse of the tree on the car | कारवर अचानक कोसळले झाड

कारवर अचानक कोसळले झाड

औरंगाबाद : मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघालेल्या कारवर एन-५, टाऊन सेंटर परिसरातील गुलमोहराचे भलेमोठे झाड मुळापासून कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने कारमध्ये चालकाशिवाय कोणीही नव्हते, तसेच बाजूच्या जागेवर झाड कोसळल्याने कारचालक बालंबाल बचावला.
मनोहर चोखाजी भदर्गे (रा. मुकुंदवाडी ), असे या घटनेत बालंबाल बचावलेल्या चालकाचे नाव आहे. उस्मानपुरा येथील रहिवासी किरण जाधव यांची कार (एम- २०, बीटी- ६७१५) शंकरराव शेळके यांच्या टूर्समार्फतकेंद्रीय टाऊन सेंटर परिसरातील उत्पादन शुल्क, सीमा शुल्क तथा सेवाकर आयुक्त कार्यालयात भाडेतत्त्वावर लावण्यात आलेली आहे. येथील अधिकाऱ्यांसाठी ही कार चालविण्यात येत असून आपण चालक म्हणून काम करीत असल्याची माहिती मनोहर भदर्गे यांनी दिली.
शनिवारी सकाळपासून रिमझिम बरसणारा पाऊस पडत असताना दुपारी चार वाजेच्या सुमारास वाऱ्याबरोबर पावसाचे आगमन झाले. याच वेळी एन-७ परिसरातील शाळेतून सदर अधिकाऱ्यांच्या मुलांना आणण्यासाठी भदर्गे निघाले होते.कार्यालयाच्या अवघ्या काही अंतरावर कार जात नाही तोच रस्त्याच्या बाजूला असलेले गुलमोहराचे झाड मुळापासून कोसळत असल्याचे भदर्गे यांना दिसले. त्यांनी तात्काळ कार जागेवरच थांबवली. मात्र, तरीही झाड कारवर कोसळले. सुदैवाने भदर्गे यांच्या सीटच्या शेजारच्या बाजूने हे झाड कोसळले. ही बाजू चक्काचूर झाली, तसेच कारचे छत वाकले गेले आणि मागील काचही फुटली, तर भदर्गे यांच्या समोरची काच फुटलीही नाही. झाड कारच्या आणखी थोडे बाजूला पडले असते किंवा कारमध्ये आणखी कोणी असते, तर वेगळे चित्र असते. त्यामुळे या घटनेत भदर्गे बालंबाल बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
वाहतुकीला अडचण
केंद्रीय उत्पादन शुल्काच्या कार्यालयासमोरील रस्त्याचे काम सुरू असल्याने भदर्गे यांनी कार दुसऱ्या मार्गाने नेली. झाड कोसळल्यामुळे हा रस्ताही बंद झाला. दीड तास उलटूनही झाड हटविण्यात आले नव्हते. त्यामुळे वाहनचालकांना एन-७ आणि जालना रोडकडे जाण्यासाठी लांबचा फेरा मारावा लागला.
मागील वर्षीही झाड कोसळले
घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मागील वर्षीही परिसरात अशाच प्रकारे झाड कोसळल्याची घटना घडल्याची चर्चा अनेक जण करीत होते.
नशीब बलवत्तर म्हणून...
झाड कोसळत असल्याची कल्पना आल्याने कार वेळीच जागेवर थांबविली, तरीही झाड कोसळले. मात्र, घटनेत आपले नशीब बलवत्तर होते म्हणून वाचल्याचे चालक मनोहर भदर्गे यांनी सांगितले.

Web Title: The sudden collapse of the tree on the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.