चार पालिकांना अनुदानाचा भोपळा
By Admin | Updated: May 26, 2014 00:46 IST2014-05-26T00:43:13+5:302014-05-26T00:46:59+5:30
बिलोली : जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नसलेल्या चार पालिकांना अनुदानाची दमडीही मंजूर झाली नसल्याने त्या-त्या पालिकातील नगराध्यक्षांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत़

चार पालिकांना अनुदानाचा भोपळा
बिलोली : जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नसलेल्या चार पालिकांना अनुदानाची दमडीही मंजूर झाली नसल्याने त्या-त्या पालिकातील नगराध्यक्षांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत़ राज्य शासनाने अन्य पालिकांप्रमाणे सर्वांना समान वागणूक द्यावी आणि विकासात भर घालावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे़ जिल्ह्यातील पालिका क्षेत्रातील शहर विकास करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजना आणि विशेष रस्ता अनुदानातून कोट्यवधींचे अनुदान मंजूर झाले आहे़ ८ मे रोजी नगरविकास मंत्रालयातून जारी झालेल्या पालिकांच्या यादीत चार पालिकांचा समावेशच नाही़ उर्वरित सर्व पालिकांना अनुदान मंजूर करण्यात आले आहे़ बिलोली, कंधार, लोहा व मुखेड पालिकांत बिगर काँग्रेसी सत्ता असल्याने असा भेदभाव केल्याचा सूर पुढे आला आहे़ प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या उमरी, देगलूर, धर्माबाद पालिकांना जास्तीचा वाटा देण्यात आला़ दरम्यान, चार पालिकांच्या नगराध्यक्षांना असे वृत्त कळताच संतप्त भावना व्यक्त केल्या़ वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे़ असा भेदभाव व पक्षपात केल्याने शहराच्या विकासाला खीळ बसेल, असे मत चारही नगराध्यक्षांनी व्यक्त केले़ नगरविकास मंत्रालयाने फेरविचार करून इतर पालिकाप्रमाणे उर्वरित पालिकांनाही अनुदान वाटप करावे, अशी मागणी केली आहे़ (वार्ताहर) अनुदानाची प्रक्रिया मंत्रालयातून सदरील अनुदान वितरण प्रक्रिया नगरविकास मंत्रालयातूनच केली जाते़ संबंधित पालिकेच्या बँक खात्यामध्ये आरटीजीएसनुसार अनुदान वितरीत होते़ जिल्हा पातळीवर यासंदर्भात निर्णय होत नाहीत - शशी नंदा, जिल्हा प्रकल्प अधिकारी, नांदेड विकासाच्या बाबतीत पक्षपात होणार नाही, याकडे सत्ताधारी पक्षाने लक्ष द्यावे़ तसेच अनुदान वाटपामध्ये असा भेदभाव होवू नये, अशी भावना बिलोलीच्या नगराध्यक्षांनी व्यक्त केली़ - जमनाबाई खंडेराय, नगराध्यक्षा, बिलोली मुखेड शहरात वस्तीवाढ झाल्याने नागरी सुविधा देणे आवश्यक आहे़ पालिकेने रितसर मागणीसुद्धा केलेली आहे़ पण पालिकेवर शिवसेना-आघाडीची सत्ता असल्याने अनुदानाचा हात आखडता घेण्यात आला व डावलण्यात आले़ - लक्ष्मीबाई कामजे (नगराध्यक्षा, मुखेड) कंधार पालिकासाठी लागणार्या अनुदानाबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला व लेखी निवेदनही दिले आहेत़ पण पालिकेवर अपक्ष व आघाडीची सत्ता असल्याने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते़ अनुदान बाबतीत कंधारच्या संदर्भात फेरविचार व्हावा - शोभाताई नळगे, नगराध्यक्षा, कंधार अनुदानाच्या बाबतीत पक्षपात करणे योग्य नाही़ अशा भेदभाव प्रवृत्तीमुळे नागरिकांत चुकीचा संदेश जातो व वाईट परिणाम होतात़ लोहा शहराला अनुदानाची आवश्यकता आहे़ शासनाकडे पत्रव्यवहारही केलेला आहे़ - आशाताई चव्हाण, नगराध्यक्षा, लोहा