विषय समित्यांत आघाड्यांचेच वर्चस्व
By Admin | Updated: January 23, 2017 23:36 IST2017-01-23T23:36:12+5:302017-01-23T23:36:58+5:30
बीड : विषय समिती निवडीतही काकू-नाना विकास आघाडीचा वरचष्मा कायम राहिला.

विषय समित्यांत आघाड्यांचेच वर्चस्व
बीड : येथील पालिकेमध्ये उपनगराध्यक्ष निवडीत बाजी मारल्यानंतर विषय समिती निवडीतही काकू-नाना विकास आघाडीचा वरचष्मा कायम राहिला. ६ पैकी २ समित्यांमध्ये एमआयएमच्या फुटीर गटाला वाटा देत आघाडीने सहाही समित्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
दुपारी १ वाजता सभागृहात बैठकीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विकास माने यांनी काम पाहिले. मुख्य अधिकारी प्रशांत खांडकेकर यांची यावेळी उपस्थिती होती. हात उंचावून मतदान करण्याची प्रक्रिया यावेळी पार पडली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मतदानात सहभाग घेतला नाही.
पाणीपुरवठा समितीच्या सभापती पदासाठी काकू-नाना आघाडीकडून फारुक पटेल, तर शिवसेनेचे लक्ष्मण विटकर यांनी अर्ज दाखल केले. पटेल यांना ६, तर विटकर यांना स्वत:चे एकमेव मत पडले. बांधकाम विभागाच्या समितीसाठीही विटकर यांनी अर्ज दाखल केला, तर काकू-नाना आघाडीकडून अमर नाईकवाडे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. नाईकवाडे यांना ६, तर विटकर यांना त्यांचे स्वत:चेच मत पडले. त्यामुळे पटेल व नाईकवाडे यांची सभापतीपदी घोषणा करण्यात आली. विटकर यांनी नियोजन व विकास समितीसाठीही नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा अर्ज अवैध ठरला. काकू-नाना विकास आघाडीकडून अश्विनी धर्मराज गुंजाळ यांची वर्णी लागली. महिला व बालकल्याण सभापतीपद एमआयएम फुटीर गटाच्या शेख जफर सुलताना बशीर यांच्याकडे गेले, तर उपसभापतीपदी आघाडीच्या सीता मोरे यांची निवड करण्यात आली. एमआयएम फुटीर गटाच्या मोमीन अझरोद्दीन यांची शिक्षण व क्रीडा समितीवर सभापती म्हणून निवड झाली. स्थायी समिती सदस्य म्हणून आघाडीतर्फे रमेश चव्हाण यांची वर्णी लागली. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)