विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर घसरला !

By Admin | Updated: May 22, 2015 00:32 IST2015-05-22T00:29:13+5:302015-05-22T00:32:22+5:30

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी, यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

Studies of study drop! | विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर घसरला !

विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर घसरला !


बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद
शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी, यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. परंतु, दुसरीकडे विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर झपाट्याने घसरत असल्याची धक्कादायक माहिती ‘असर’ संस्थेकडून करण्यात आलेल्या पहाणीतून समोर आली आहे. तिसरी ते पाचवीच्या वर्गातील केवळ ३८ टक्के विद्यार्थीच वजाबाकी करू शकले. तर चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०१०-२०११ मध्ये अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण हे ७४.४ टक्के इतके होते. तेव्हापासून ते आजतागायत विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर झपाट्याने खाली येऊ लागला आहे. ही बाब सर्वांच्याच दृष्टिकोनातून चिंतेची मानली जात आहे.
मागील चार-पाच वर्षांतील शिक्षण पद्धतीवर नजर टाकल्यास नवनवीन संकल्पना, पद्धती अंमलात येवू लागल्या आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत पर्यायाने अध्ययनस्तरामध्येही त्याच गतीने वाढ होणे अपेक्षित आहे. परंतु, तसे होत नसल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे. ‘असर’ संस्थेकडून करण्यात आलेल्या या पहाणीतील निष्कर्ष हे शिक्षक, अधिकारी आणि पुढाऱ्यांनाही आत्मचिंतन करायला लावणारे आहेत. २०१०-२०११ मध्ये करण्यात आलेल्या पहाणीवेळी जिल्ह्यातील सुमारे ७४.४ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी करता येत होती. म्हणजेच केवळ २४ ते २५ टक्केच विद्यार्थी गणितामध्ये कच्चे होते. यानंतर तरी अध्ययनस्तर उंचावणे अपेक्षित होते. परंतु, घडले याच्या उलट ३२ ते ३३ टक्क्यांनी वजाबाकी करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. २०११-२०१२ मध्ये वजाबकी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ४१.९ टक्क्यांपर्यंत खाली आले. त्यानंतर २०१२-२०१३ मध्ये हे प्रमाण ४३.९ टक्के एवढे झाले. तर दुसरीकडे २०१३-२०१४ मध्ये अध्ययनस्तर आणखी खालावला. या वर्षामध्ये पहाणी केलेल्यांपैकी २६.९ टक्केच विद्यार्थी वजाबाकी करू शकले. तर यंदाचे प्रमाण (२०१४-१५) हे ३८.२ टक्के इतके असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. समोर आलेले हे चित्र बदलण्यासाठी आता शिक्षक, अधिकारी अणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
‘असर’च्या वतीने तिसरी ते पाचविच्या विद्यार्थ्यांना पहिली स्तरावरील उतारा वाचनासाठी देण्यात आला होता. २०१०-२०११ मध्ये उतारा वाचन करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ९५.५ टक्के एवढे होते. त्यामध्ये घसरण होवून २०१४-२०१४ मध्ये ६४.७ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. २०११-१२ मध्ये हे प्रमाण ६७.९ टक्के, २०१२-१३ मध्ये ७८.८ टक्के तर २०१३-२०१४ मध्ये उतारा वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे ७५.८ एवढे होते. तर यंदा त्यामध्ये घट होवून ६४.७ पर्यंत खाली आले आहे. ही ओळख पुसण्यासाठी आता वेगवेगळे बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
पहिली ते दुसरीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अंक ओळखही तपासण्यात आली आहे. यामध्येही अनेक धक्कादायक निष्कर्ष चव्हाट्यावर आले आहेत. पाच वर्षांपूर्वी सुमारे ९५.८ टक्के विद्यार्थ्यांना १ ते ९ पर्यंत अंक ओळख होती. त्यानंतर मात्र, हे प्रमाण कमी-कमी होत गेले. २०११-१२ मध्ये हे प्रमाण ९०.७ टक्क्यांपर्यंत खाली आले. २०१२-१३ मध्ये ८५.८, २०१३-१४ मध्ये ७८.६ टक्के एवढे होते. तर यंदा करण्यात आलेल्या पहाणीदरम्यान ८१ टक्के विद्यार्थ्यीच अंक ओळखू शकले. त्यामुळे याही बाबतीत योग्य त्या उपाययोजना व्हाव्यात, अशी अपेक्षा पालकांतून व्यक्त होत आहे.
‘असर’कडून अक्षर वाचनही घेण्यात आले. सदरील पहाणीदरम्यानही अक्षर वाचता येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सातत्याने कमी होत असल्याचे समोर आले. पाच वर्षांपूर्वी २०१०-११ मध्ये ९४.५ टक्के विद्यार्थी अक्षर वाचू शकत होते. त्यानंतर २०११-१२ मध्ये हे प्रमाण कमी होवून ९३.६ पर्यंत खाली आले. २०१२-१३ मध्ये ८३.८ टक्के, २०१३-१४ मध्ये ८०.९ आणि २०१४-१५ मध्ये सदरील प्रमाण ७५.९ टक्क्यांपर्यंत खाली आले. सदरील बाबही गुणवत्ता वाढीच्या दृष्टिकोनातून अत्यंत मारक मानली जाते.

Web Title: Studies of study drop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.