झेडपी’शाळांतील विद्यार्थ्यांना संगणकाचा लळा
By Admin | Updated: September 4, 2014 01:24 IST2014-09-04T01:16:24+5:302014-09-04T01:24:24+5:30
बालाजी आडसूळ , कळंब स्पर्धेच्या युगात संगणक ज्ञान नसणाऱ्यांची अवस्था निरक्षरांसारखी झाली आहे. त्यामुळेच आपल्या पाल्याला संगणकाचे किमान प्राथमिक ज्ञान मिळावे यासाठी आग्रही असतात.

झेडपी’शाळांतील विद्यार्थ्यांना संगणकाचा लळा
बालाजी आडसूळ , कळंब
स्पर्धेच्या युगात संगणक ज्ञान नसणाऱ्यांची अवस्था निरक्षरांसारखी झाली आहे. त्यामुळेच आपल्या पाल्याला संगणकाचे किमान प्राथमिक ज्ञान मिळावे यासाठी आग्रही असतात. मात्र ग्रामीण भागात सोयी-सुविधांचा अभाव, पालकांची जेमतेम आर्थिक स्थिती यामुळे या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही संगणकीय शिक्षणापासून वंचित रहावे लागत होते. परंतु शालेय शिक्षण विभागाने राबविलेल्या ‘आयसीटी’ या विशेष योजनेअंतर्गत तालुक्यातील ४० जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संगणकाचे धडे गिरवू लागले आहेत.
सध्या शासकीय कार्यालये पेपरलेस होत असून, खाजगी अध्यापनाबरोबरच विविध ठिकाणी संगणकाचा नित्य वापर होत आहे. यामुळे डाटा एन्ट्रीपासून विविध दैनंदिन कामकाजाच्या सॉफ्टवेअरची मागणी वाढली आहे. यामुळे या क्षेत्रात कुशल मनुष्यबळासाठी अगणित संधी उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासंदर्भात शहरी भागात मोठ्या प्रमाणात संगणक शिक्षण देणाऱ्या संस्था व सोयी उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठीच राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत केंद्र पुरस्कृत माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान योजना राबविण्यात येत आहे. शिक्षण, अधिकार अधिनियमनानुसार माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आता संगणक माहिती व तंत्रज्ञान हा विषयही अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ५०० शाळांचा या योजनेत समावेश करण्यात आला होता. तर दुसऱ्या टप्प्यात २५०० व तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ५००० शाळांचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये बहुतांश शाळा ग्रामीण भागातील असल्याने आर्थिकदृट्या दूर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत आहे.
माध्यमिक शाळामधील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेतच संगणक शिक्षण व त्याद्वारे नियमित अभ्यासक्रमाची उजळणी करण्याची संधी या योजनेमार्फत उपलब्ध झाली आहे. बांधा, वापरा, हस्तांतरण तत्वाप्रमाणे या योजनेची राज्यात व्हेंडर्स नेमून अंमलबजावणी चालू आहे. यासाठी निवड करण्यात आलेल्या शाळात संगणक लॅब उभारून त्याचा नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कालावधीत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व शालेय अभ्यासक्रमाचे दृकश्राव्य माध्यमातून अध्यापन केले जात आहे. यासाठी प्रत्येक शाळानिहाय स्वतंत्र प्रशिक्षक नेमण्यात आला आहे. संबंधित शाळात नेमलेल्या व्हेंडर्सनी १२ संगणक संच, दोन वेब कॅमेरे, स्कॅनर २, प्रोजेक्टर, ब्रॉडबॅन्ड कनेक्शनयुक्त प्रयोगशाळा उभारल्या आहेत.
आयसीटी योजनेअंतर्गत दूसऱ्या टप्प्यात तालुक्यातील खामसवाडी, ईटकूर, मोहा, सावित्रीबाई फुले, विद्याभवन (कळंब), संभाजी विद्यालय (मंगरूळ), जि. प. प्रशाला मुलींची व मुलांची शाळा कळंब, हनुमान विद्यालय घारगाव या नऊ शाळांची निवड करण्यात आली आहे. तर तिसऱ्या टप्प्यात आंदोरा, आवाड शिरपुरा, भाटशिरपुरा, भोगजी, चोराखळी, गोविंदपूर, गौर, गौरगाव, ईटकूर, कळंब (३ शाळा), कन्हेरवाडी, खामसवाडी, कोथळा, खोंदला, लोहटा पूर्व, माळकरंजा, पानगाव, पाडोळी, बोरगाव, वाठवडा, शिराढोण, सौंदणा (अंबा), जवळा (खु.), येरमाळा, सापनाई, सातेफळ, शेळका धानोरा, ढोराळा या ३१ गावातील चाळीस शाळांचा समावेश आहे.