विद्यापीठातील ग्रंथालय, वसतिगृहे सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:07 IST2021-01-08T04:07:33+5:302021-01-08T04:07:33+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हॉस्टेल, ग्रंथालय आणि नियमित तासिका सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन मुख्य ...

विद्यापीठातील ग्रंथालय, वसतिगृहे सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचा ठिय्या
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हॉस्टेल, ग्रंथालय आणि नियमित तासिका सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन मुख्य इमारतीसमोर सुरू आहे. यूजीसीने निर्देश दिल्यानंतरही येथील प्रशासनाने विद्यापीठ नियमित सुरू केले नसल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.
राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांत ऑनलाइन शिक्षण बंद करून तासिका सुरू झाल्या आहेत. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हॉस्टेल, ग्रंथालय आणि तासिका सुरू झाल्या नाहीत. हॉस्टेल आणि ग्रंथालय बंद असल्याने संधोधक विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. यामुळे यूजीसीच्या निर्देशानुसार प्रशासनाने विद्यापीठातील ऑनलाइन शिक्षण बंद करून विभागात नियमित तासिका सुरू करून ग्रंथालय आणि हॉस्टेल तात्काळ सुरू करावीत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
रात्रीही सुरू होते ठिय्या आंदोलन
याबाबत विद्यार्थी संघटनांच्या शिष्टमंडळाने विद्यापीठ प्रशासनाला निवेदन दिले. यावर प्रकुलगुरू श्याम शिरसाट यांनी जिल्हा प्रशासनासोबत बोलून निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका घेतली. यामुळे संघटनांनी आक्रमक होत प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. या आंदोलनात अमोल खरात, लोकेश कांबळे, श्रद्धा खरात, दीक्षा पवार, अक्षय जाधव, स्वाती चेके, नितीन वावले, अनिल जाधव, राम सूर्यवंशी, सुरेश सानप, रामेश्वर कबाडे, निशिकांत कांबळे, पांडुरंग भुतेकर, अविनाश सावंत, राम सूर्यवंशी आदींचा सहभाग आहे.