विद्यार्थ्यांनी तयार केले ५०० रोपटे
By Admin | Updated: September 8, 2014 00:54 IST2014-09-08T00:23:46+5:302014-09-08T00:54:48+5:30
राम तत्तापूरे , अहमदपूर पर्यावरणाचे संतुलन रहावे म्हणून तालुक्यातील खंडाळी येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांनी पाखरांनी खाल्लेल्या लिंबोळीच्या बिया जमा करून त्यापासून ५०० रोपटे तयार

विद्यार्थ्यांनी तयार केले ५०० रोपटे
राम तत्तापूरे , अहमदपूर
पर्यावरणाचे संतुलन रहावे म्हणून तालुक्यातील खंडाळी येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांनी पाखरांनी खाल्लेल्या लिंबोळीच्या बिया जमा करून त्यापासून ५०० रोपटे तयार करून गावकऱ्यांना ती शुक्रवारी वाटप केली़ या अभिनव उपक्रमाचे गावकऱ्यांतून कौतुक होत आहे़
दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन ढासळत आहे़ त्याचा परिणाम मानवी जीवनावरही होत आहे़ पर्यावरणाचे संतुलन राखावे म्हणून अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबविला आहे़ या शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या जवळपास ५०० विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अशोक हालसे आणि शाळेतील सहशिक्षकांनी परिसरात पाखरांनी खाल्लेल्या लिंबोळीच्या बिया जमा करण्यास सांगितले़ विद्यार्थ्यांनी या बिया जमा केल्या़ त्यानंतर शाळेने शेवग्याच्या बियाही त्यांना उपलब्ध करून दिल्या़ शाळेने प्लास्टिकच्या पिशव्या मोफत देऊन विद्यार्थ्यांना या बिया त्यात लावण्यास सांगितल्या़ शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी जूनमध्ये हे कार्य केले़ जवळपास अडीच महिन्याच्या कालावधीत या बियांचे रोपटे तयार झाले़
गावकऱ्यांनी आपले अंगण, परसबाग व शेतात हे रोपटे लावावे म्हणून जनजागृती करून रोपट्यांच्या संवर्धनाच्या हमीवर नागरिकांना भेट देण्यात आले़ यापूर्वी सन २०१२ मध्ये अंधोरी जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी १ हजार रोपटे तयार करून ग्रामस्थांना वाटप केले होते़ हा अनोखा उपक्रम राबविण्यासाठी सहशिक्षक धनंजय उजनकर, विनायक दराडे, मारोती रूद्रावाड, वैजनाथ सूर्यवंशी, बबन गुळवे, राजकुमार चाटे, गयाबाई लहाने सरस्वती कांबळे, सुरेखा मोरे, पंकज दंडिमे, संजय कराड, शिवाजी चव्हाण यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले़ या अनोख्या उपक्रमाचे जिल्हा परिषद सदस्या प्राचार्या रेखा तरडे, पंचायत समिती सदस्य गणेश पौळ, गटविकास अधिकारी नितीन दाताळ, गटशिक्षणाधिकारी एल़एम़डुरे, सरपंच व्यंकटराव पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष माधवराव शेळके, उपाध्यक्ष प्रशांत शिंदे, उपसरपंच रोहिदास पौळ, अरविंद पौळ यांच्यासह गावकऱ्यांनी कौतुक केले़ (वार्ताहर)