दमदार पुनरागमन...
By Admin | Updated: August 5, 2015 00:33 IST2015-08-05T00:20:32+5:302015-08-05T00:33:36+5:30
जालना : जालना शहरासह बदनापूर, अंबड, घनसावंगी, भोकरदन, जाफराबाद, मंठा आणि परतूर या तालुक्यांत प्रदीर्घ विश्रांतीनंतर मंगळवारी पावसाने हजेरी लावली

दमदार पुनरागमन...
जालना : जालना शहरासह बदनापूर, अंबड, घनसावंगी, भोकरदन, जाफराबाद, मंठा आणि परतूर या तालुक्यांत प्रदीर्घ विश्रांतीनंतर मंगळवारी पावसाने हजेरी लावली. काही भागात दमदार तर काही ठिकाणी संततधार पाऊस झाला. या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले असून, आगामी २४ तासांत मध्यम व जोरदार पावसाचा अंदाज हवामान वेधशाळेने वर्तविला आहे.
मंठा : तालुक्यात सकाळपासून रिमझिम पावसाला सुरूवात झाली. शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी पिके तरतील अशी स्थिती आहे.
भोकरदन धावडा येथे सकाळपासूनच जोरदार पाऊसाला सुरूवात झाली. तब्बल पाच तास पाऊस पडल्याने काही प्रमाणात पिकांना जीवदान मिळणार आहे.
जालना तालुक्यातील सेवली येथे सकाळपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली. बाजाराचा दिवस असल्याने गावात सकाळपासूनच गर्दी होती. परंतु पावसात भिजण्याची आनंद लुटला. दिवसभर पाऊस असल्याने बाजाराव त्याचा परिणाम झाला.
भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात सकाळी सातपासून पावसाला सुरूवात झाली. मध्यम स्वरूपाचा पाऊस पिकास मानणार असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.
राजूरसह परिसरात पाऊस दिवसभर सुरू होता. त्यामुळे आज दिवसभर सूर्यदर्शन होऊ शकले नाही. अद्याप ओेढे, नाले, तलाव, विहिरी कोरड्याठाक आहेत.
बदनापूर तालुक्यात व शहरात मंगळवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. या पावसामुळे वाहतूक मंदावली होती. भोकरदन तालुक्यातील धावडा, वालसांवगी, पारध, पिंपळगाव रेणुकाई, जळगाव सपकाळ,आन्वा, भोकरदन, सिपोरा बाजार, पिंपळगाव कोलते, राजुर, केदारखेडा, आव्हाणा परिसरात सर्वदूर समाधान कारक पाऊस सुरू झाला.यामुळे मका, कापूस, सोयाबीन, मिरची, उडीद, मूग, आदी पीकाना जिवदान मिळाले आहे़ आव्हाणा येथे शेतकऱ्यांनी डफड्यावर गावात मिरवणूक काढुन पावसाचे स्वागत केले़ आन्वा, वाकडी, कोडी धोडखेडा, कारलावाडी आदी परिसरात सकाळीच पावसाला सुरूवात झाली. पावसासाठी मुस्लिम बांधवांनी पावसासाठी विशेष नमाज अदा करण्यात आली. तसेच हिंदू महिलांनी देखील महादेव मंदिरात प्रार्थना केली होती.
घनसावंगी तालुक्यातील पारडगाव परिसरात सकाळी सातपासून रिमझिम पावसाने सुरूवात केल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.