सशक्त, देखण्या कलादर्शनाने भारावले रसिक

By Admin | Updated: December 12, 2014 00:56 IST2014-12-11T23:46:27+5:302014-12-12T00:56:01+5:30

औरंगाबाद : दृष्टी नसतानाही केलेले नृत्य कमालीचे डोळस होते... मूकबधिर असूनही गातानाचा सूर सच्चा होता आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल असूनही केलेला अभिनय मात्र सशक्त होता...

Strong, entertaining artistically filled with art | सशक्त, देखण्या कलादर्शनाने भारावले रसिक

सशक्त, देखण्या कलादर्शनाने भारावले रसिक

औरंगाबाद : दृष्टी नसतानाही केलेले नृत्य कमालीचे डोळस होते... मूकबधिर असूनही गातानाचा सूर सच्चा होता आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल असूनही केलेला अभिनय मात्र सशक्त होता... सुदृढ माणसांनाही लाजवेल असा प्रसन्न कलाविष्कार देशभरातील विशेष मुलांनी सादर केला, तेव्हा उपस्थित रसिक अक्षरश: नि:शब्द झाले.
साऊथ सेंट्रल कल्चरल झोनतर्फे आयोजित उमंग सांस्कृतिक महोत्सवात देशभरातून आलेल्या विशेष मुलांनी नृत्य, नाट्य आणि गायनाचे उत्स्फूर्त सादरीकरण केले. तापडिया नाट्यमंदिरात होणाऱ्या या तीनदिवसीय महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के यांनी केले.
औरंगाबादच्या उत्कर्ष अपंग प्रशिक्षण केंद्राच्या चमूने ‘मौला मेरे लेले मेरी जान..’ या गाण्यावर पर्यावरण रक्षणाची थीम घेऊन अर्थवाही नृत्य सादर केले. त्यांचे प्रशिक्षक सिद्धार्थ करवाडे यांनी केलेल्या सांकेतिक भाषेतील दिग्दर्शनानुसार या मूक-बधिर मुलांनी केलेला पदन्यास थक्क करणारा होता. परदीप कौर हिने केलेल्या भांगडा नृत्यातील दमदार पदन्यास आणि ऊर्जा ‘वन्स मोअर’ घेऊन गेली.
जयपूर येथील नंदकिशोर, आशिष व अंकित यांनी केलेल्या स्केटिंग नृत्याला उत्स्फूर्त वाहवा मिळाली. मुंबईच्या कमला मेहता स्कूल फॉर ब्लाइंड या संस्थेच्या मुलींनी रोप मल्लखांबावरील योगासन आणि कसरती सादर केल्या. स्वत:च्या शारीरिक मर्यादांवर मात करीत समन्वय आणि आत्मविश्वासाचे त्यांनी घडवलेले दर्शन अंतर्मुख करून गेले. त्यांचे प्रशिक्षक उदय देशपांडे व प्रा. नीता ताटके यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. विलास जानवे यांनी सूत्रसंचालन केले. उद्या महोत्सवात सायंकाळी पाच वाजता ‘भरारी’ हे प्रेरणादायी नाटक सादर होईल.

Web Title: Strong, entertaining artistically filled with art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.