कर्मचारी आजपासून संपावर
By Admin | Updated: June 2, 2014 01:10 IST2014-06-02T01:08:03+5:302014-06-02T01:10:20+5:30
परभणी : पाणीपुरवठा विभागातील कामगारांचे थकित वेतन व अन्य मागण्यांसाठी कर्मचारी २ जूनपासून बेमुदत संपावर जाणार होते.

कर्मचारी आजपासून संपावर
परभणी : पाणीपुरवठा विभागातील कामगारांचे थकित वेतन व अन्य मागण्यांसाठी कर्मचारी २ जूनपासून बेमुदत संपावर जाणार होते. त्या संदर्भात मनपा आयुक्त यांनी कर्मचार्यांची बैठक बोलावून संप मागे घेण्यासाठी चर्चा केली. मात्र चर्चा फिस्कटल्याने २ जूनपासून पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. यामुळे कामकाजावर परिणाम होणार आहे. परभणी शहर महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्यांना २९ मे रोजी एक महिन्याचा पगार देण्यात आला आहे. पालिकेचे उत्पन्न अत्यंत तोकडे आहे. एलबीटी वसुली कमी आहे. महापालिकेचे उत्पन्न व अस्थापनेचा खर्च पाहता पालिकेतील कर्मचार्यांच्या पगारी वेळेत करणे अशक्य झाल्यामुळे वसुलीत मालमत्ता कर, पाणीपट्टी व पालिकेच्या गाळ्यापासून उत्पन्न वाढविण्याचा प्रशासनाने प्रयत्न करीत आहे. परंतु, म्हणावे तसे यश मिळत नसल्याने मनपा पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्यांचे मागील सहा महिन्यांचा पगार झाला नाही. त्यामुळे कर्मचार्यांनी कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली २ जूनपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा मनपा आयुक्त यांना दिला होता. त्या अनुषंगाने मनपा आयुक्त अभय महाजन, उपायुक्त दीपक पुजारी, पाणीपुरवठा अधिकारी किशोर संद्रे, लालबावटाचे कॉ. राजन क्षीरसागर यांच्यासह मनपा कर्मचार्यांची बैठक १ जून रोजी घेण्यात आली. मनपा आयुक्त अभय महाजन म्हणाले, शासनाकडून थकित अनुदान वर्ग होताच कर्मचार्यांचे वेतन तत्काळ करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र कर्मचार्यांनी आपल्या मागण्या रेटून धरल्या. त्यामुळे चर्चा फिस्कटली. २ जूनपासून मनपा पाणीपुरवठा कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन करणार आहेत. यामुळे नागरिकांना गैैरसोयीस सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)मनपा संघटनेसोबत मनपा आयुक्त अभय महाजन यांनी सकारात्मक भूमिका घेऊन मागण्या सोडविण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागेल, असे सांगितले. परंतु, मनपा कर्मचार्यांनी टोकाची भूमिका घेत संप पुकारला आहे. त्यामुळे संघटनेने नागरिकास वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालिकेच्या वतीने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त अभय महाजन यांनी केले आहे.सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. तसे नागरिकांना पाण्याची आवश्यकता वाढली आहे. त्यातच कर्मचारी बेमुदत आंदोलन करणार आहेत. त्यामुळे परभणीकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. मनपाकडून अगोदर १०-१२ दिवसांना पाणी मिळत आहे. त्यातच पाणीपुरठवा विभागातील कर्मचारी संपावर गेल्यास पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.