आत्महत्या केलेल्या महिलेच्या अंत्यसंस्कारावरुन तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 22:40 IST2019-06-25T22:40:31+5:302019-06-25T22:40:42+5:30
आंबेलोहळ येथे सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेच्या अंत्यसंस्कारावरुन मंगळवारी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आत्महत्या केलेल्या महिलेच्या अंत्यसंस्कारावरुन तणाव
वाळूज महानगर : आंबेलोहळ येथे सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेच्या अंत्यसंस्कारावरुन मंगळवारी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मृत महिलेच्या नातेवाईकांनी शासकीय गायरान जमिनीत अंत्यसंस्कार करण्याचा अट्टहास धरला. महसूल व एमआयडीसी पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद मिटविला. यानंतर सायंकाळी या महिलेवर भिल्ल समाजाच्या स्माशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
आंबेलोहळ येथील सोनाली तानाजी साळुंके हिने सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शासकीय रुग्णालयात मंगळवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी गावातील शासकीय गायरान जमिनीवर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरु केली. गावात भिल्ल समाजाची सार्वजनिक स्मशानभूमी असताना सोनालीच्या नातेवाईकांनी शासकीय जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतल्याने गावकऱ्यांनी यास विरोध दर्शविला. यामुळे गावात तणावाचे वातावरण पसरले होते.
पूर्वी गायरान जमीन आम्ही कसत असल्याने याच ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार करणार असल्याचे सोनालीचे वडील भाऊसाहेब माळ व नातेवाईकांनी ग्रामस्थांना सांगितले. गायरान जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने ग्रामस्थांनी अंत्यसंस्कार करण्यास विरोध दर्शविला होता. दरम्यान, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.जी.के.कोंडके हे करीत आहेत.