जातीयवादी शक्तीच्या विरोधात लढा मजबूत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:27 IST2020-12-17T04:27:37+5:302020-12-17T04:27:37+5:30
औरंगाबाद : जातीयवादी शक्तीच्या विरोधात भीमशक्तीचा लढा मजबूत करण्यासाठी औरंगाबाद येथे मौलाना आझाद संशोधन केंद्रात मराठवाडास्तरीय बैठक पार पडली. ...

जातीयवादी शक्तीच्या विरोधात लढा मजबूत करा
औरंगाबाद : जातीयवादी शक्तीच्या विरोधात भीमशक्तीचा लढा मजबूत करण्यासाठी औरंगाबाद येथे मौलाना आझाद संशोधन केंद्रात मराठवाडास्तरीय बैठक पार पडली. यावेळी चंद्रकांत हंडोरे यांनी पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की, देशभरात जातीयवादी शक्ती डोके वर काढत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याकडे सुरू आहे. केंद्र सरकार हे शेतकरी आणि कामगारविरोधी कायदे करीत आहे. मागासवर्गीयांचा नोकऱ्यांमधील अनुशेष भरला जात नाही, पदोन्नतीतील आरक्षण नाकारले जात आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, फेलोशिप दिली जात नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देशातील लोकशाही आणि संविधान निष्प्रभ केले जात आहे, याविरोधात आक्रमक लढा उभारण्याची गरज आहे. या बैठकीला भीमशक्तीचे कार्याध्यक्ष तथा नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे, मोहन माने, उपाध्यक्ष दिनकर ओंकार, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष पंडितभाई नवगिरे यांच्यासह जिल्हाध्यक्ष किशोर जाधव, राजू मंजूळे, शहराध्यक्ष संतोष भिंगारे, मराठवाड्यातील जिल्हा व शहराध्यक्षांची उपस्थिती होती.
यावेळी संघटन बांधणीत कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब नवगिरे यांनी केले. प्रस्ताविक दिनकर ओंकार यांनी केले. शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी बैठक यशस्वीेतेसाठी परिश्रम घेतले.