कथाकथनातून समाजमांडणी
By Admin | Updated: July 27, 2014 01:13 IST2014-07-27T00:02:06+5:302014-07-27T01:13:56+5:30
लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित २१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात शनिवारी दुपारी दुसऱ्या सत्रात कथाकथन घेण्यात आले़
कथाकथनातून समाजमांडणी
लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित २१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात शनिवारी दुपारी दुसऱ्या सत्रात कथाकथन घेण्यात आले़ यामध्ये हिंगोली येथील कथाकार शिलवंत वाढवे यांनी सादर केलेल्या पटपडताळणी या शैक्षणिक क्षेत्रावरील कथेस कथाप्रेमीतून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला़
लोकनेते विलासराव देशमुख साहित्यनगरी, महात्मा बसवेश्वर विचारपीठावर दयानंद सभागृहात संमेलनाच्या तिसऱ्या टप्यात शनिवारी कथाकथन कार्यक्रम घेण्यात आला़ अध्यक्षस्थानी कथाकार डॉ़ भास्कर बडे होते़ मंचावर अंबादास पवार, अरून गिरी, प्रकाश घादगिने, काका शिंदे, शिलवंत वाढवे, बेबी सरोज, शिवाजी गुट्टे, आनंद कदम आदी मान्यवर उपस्थित होते़
हिंगोली येथील शिलवंत वाढवे यांनी ‘पटपडताळणी’ या कथेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षणसंस्था व तेथील संस्थाचालकांचा तोरा काय असतो़ त्यांना घाबरून संस्थेतील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेला विद्यार्थी मिळविण्यासाठी काय कसरत करावी लागते़ परंतू पटपडताळणीच्या वेळी वास्तवात संस्थाचालक व शिक्षकांची काय भंबेरी उडते यांचे वास्तव दर्शन घडविण्याचा प्रयत्न वाढवे यांनी आपल्या ‘पटपडताळणी’ या कथेतून केला़ लातूर येथील कथाकार प्रकाश घादगिने यांनी कोकीळेचा त्याग या कथेच्या माध्यमातून कश्मिर येथे हनिमूनला गेलेल्या जोडप्याचा प्रसंग मांडण्याचा प्रयत्न केला़ त्यांच्यात गुलाबी फुल व पांढऱ्या वेगवेगळ्या फुलांच्या मोहापोटी झालेला त्याचा विरह व त्यांना एकत्र करण्यासाठी केलेला कोकीळेचा प्रयत्न प्रेक्षकांसमोर सादर करून निसर्गकथेचे महत्व त्यांनी दाखवून दिले आहे़
बोरी येथील काका शिंदे या कथाकारांने ‘अहिल्या’ या कथेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मजुरी करणारी सिमंता व तिच्यावर होणारा दारूड्या पतीचा अत्याचाऱ, पतीचा आजाराने झालेला मृत्यू़ ‘अहिल्या’ या निरागस मुलीवर एका दुकानदाराने केलेला अत्याचार त्यातूनही न्यायालयात धाव घेतली असता पुराव्याअभावी होणारी आरोपीची मुक्तता याचे वास्तव चित्रण उभे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला़ तर अंबादास केदार यांनी ‘धुरा’ ही कथा सादर केली़
यावेळी सौदागर नवगिरे, डॉ़ श्रीकांत भुजबळ, सुनिल गोयकर, बालाजी शितोळे, तुकाराम कुर्तडकर, शशिकांत सावंत, विठ्ठलराव जोंधळे, राजेंद्र कोळगे, सत्यवान जगताप, मधुर काळभोर यांना छत्रपती संभाजी राजे व महात्मा फुले गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले़ (प्रतिनिधी)
लातुरातील दयानंद सभागृहात आयोजित नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लातूरकरांना वैैचारिक मेजवाणी उपलब्ध झाली आहे़ यासोबतच विविध लेखकांची शेकडो पुस्तकेही याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत़
सभागृहाबाहेर जवळपास १० स्टॉलवरुन पुस्तकांची सवलतीत विक्री करण्यात येत आहे़ महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्यासह देशभरातील महापुरुषांची चरित्रे उपलब्ध झाली आहेत़ ललित साहित्य, कथा, कादंबऱ्या तसेच लहान मुलांचीही पुस्तके स्टॉलवरुन दिसून आली़