चैत्यगृहाचे काम बंद
By Admin | Updated: September 4, 2014 01:24 IST2014-09-04T01:14:58+5:302014-09-04T01:24:33+5:30
सुमेध वाघमारे , तेर उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पुरातन चैत्यगृह आहे. या चैत्यगृहाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी जानेवारी २०१२ मध्ये पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खनाला सुरुवात

चैत्यगृहाचे काम बंद
सुमेध वाघमारे , तेर
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पुरातन चैत्यगृह आहे. या चैत्यगृहाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी जानेवारी २०१२ मध्ये पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खनाला सुरुवात करण्यात आली होती. बरीचशी कामे झाल्यानंतर निधीची कमतरता निर्माण झाल्याने उत्खननाचे काम बंद पडले आहे. विशेष म्हणजे २० लाख १७ हजार एवढ्या वाढीव निधीचा प्रस्ताव पुरातत्व विभागाकडे पाठवून एक वर्षाचा कालावधी लोटला. मात्र एक छदामही अद्याप प्राप्त झालेला नाही.
१९६८ मध्ये येथे चैत्यगृहाचे अवशेष उघडकीस आले. त्यामुळे बौद्धकालीन धार्मिक वास्तुचा आणखी एक पुरावा समोर आला होता. याबाबत सखोल माहिती घेण्यासाठी डॉ. मोरेश्वर दिक्षीत यांनी उत्खनन केल्यानंतर अर्ध गोलाकृती चैत्यगृह आढळून आले. या चैत्यगृहाची लांबी १ मिटर व रुंदी ५.५. मिटर आहे. त्याचप्रमाणे समोरच्या भागात एक दरवाजा असून, चौकट लाकडी होती. दरवाज्यातून आत शिरण्यासाठी तीन पायऱ्याही आढळून आल्या होत्या. कालांतराने चैत्यगृहाच्या परिसरात भर टाकून उंची वाढविण्यात आली. स्तुपाच्या भोवताली २.७ बाय २ मिटर एवढ्या आकाराचा विटाचा चौथरा बांधण्यात आला. तसेच भिंतही बांधली. त्याचप्रमाणे लाकडी दरवाजा बंद करुन त्याठिकाणी भिंत बांधण्यात आली. नवे प्रवेशद्वार पहिल्यापेक्षा लहान आकाराचे होेते.
या चैत्यगृहास गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी माजी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून २५ लाखाचा निधी प्राप्त झाला होता. या माध्यमातून ११ जानेवारी २०१२ पासून उत्खननाला सुरुवात करण्यात आली. कालांतराने संरक्षण भिंत बांधून चैत्यगृहाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यात आले. जुलै २०१२ मध्ये चैत्यगृहाच्या संरक्षणाचे काम पुढे करीत उत्खनन केलेल्या भागावर ताडपत्री टाकून त्यावर माती टाकण्यात आली. २०१३ मध्ये चैत्यगृहावर पत्र्याच्या माध्यमातून छत तयार करण्यात आले. मात्र आजही अनेक कामे अपूर्ण आहेत. चैत्यगृहावरील छत विस्तारीत करणे, पाण्यासाठी आऊटलेट काढणे, मुख्य रस्त्यालगत गेट तयार करणे, पूर्ण झालेल्या कामाची डागडूजी करणे, पेवर ब्लॉक काढून नव्याने बसविणे आदी कामे बाकी आहेत.
त्यातच निधी संपल्यामुळे सदर कामच बंद करण्यात आले असून, यामुळे हा ऐतिहासिक वारसा पुन्हा दुर्लक्षित झाला आहे. पुरातत्व विभागाच्या वतीने सर्व कामांचे आराखडे तयार करुन तब्बल एक वर्षापूर्वी एकत्रित प्रस्ताव पुरातत्व खात्याकडे सादर करण्यात आला होता. यासाठी २० लाख १७ हजार ६५७ रुपये एवढ्या वाढीव निधीची मागणीही करण्यात आली. मात्र हा प्रस्तावही पुरातत्व खात्याकडे धूळखात पडून आहे. प्रशासनाकडून डोळेझाक होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
अपूर्ण कामे मार्गी लावण्यासाठी २० लाख १७ हजार एवढ्या वाढीव निधीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केलेला आहे. हा निधी मंजूर होताच कामांना सुरुवात करण्यात येईल, असे पुरातत्व विभागाचे जतन सहाय्यक अभियंता आर. डी. निपाणीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.