कोटला कॉलनीची परवड थांबेना
By Admin | Updated: July 21, 2014 00:35 IST2014-07-21T00:08:42+5:302014-07-21T00:35:41+5:30
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रचंड उदासीनतेमुळे कोटला कॉलनीतील घरांची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

कोटला कॉलनीची परवड थांबेना
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रचंड उदासीनतेमुळे कोटला कॉलनीतील घरांची अत्यंत दुरवस्था झाली आहे.
घरांच्या दुरुस्तीसाठी रहिवाशांनी सेवा केंद्रात तक्रार करावी किंवा निवासस्थान दुरुस्त करून द्या, असा अर्ज करावा, अशी सूचना २०१२ मध्ये केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तक्रारी करूनही त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
कोटला कॉलनी येथे ३७ इमारतींमध्ये २२२ निवासस्थाने आहेत. काही घरे गळत आहेत, तर डे्रनेजलाईन फुटल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिसरात गवत आणि तण वाढल्यामुळे घुशींनी मोठमोठी बिळे करून जमीन पोखरून टाकली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने १ आॅक्टोबर २०१२ रोजी निवासस्थानातील दुरुस्ती कळवावी, अशी सूचना काढली होती.
‘अर्थ’कारण
सेवानिवृत्तीनंतरही ज्यांनी घरे बळकावली आहेत, त्यांना बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य आहे. हे घुसखोर कोणतेही भाडे देत नाहीत. या व्यवहारामागे अर्थकारण असल्याचा संशय आहे.
अनधिकृत लोकांचा कब्जा
काही कर्मचारी सेवानिवृत्त होऊनही येथेच राहत आहेत. निवृत्तीनंतर नियमांप्रमाणे कर्मचारी तीन महिने राहू शकतो. काही कर्मचारी निवृत्तीनंतर दोन ते आठ वर्षांपासून येथे राहत आहेत. काही घरांमध्ये अनधिकृत लोकही राहत आहेत, असे येथील रहिवाशांनी सांगितले. अनधिकृत लोक ताबा सोडत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना क्वॉर्टर मिळण्यासाठी दोन वर्षे वाट बघावी लागत आहे.
घर रिकामे करण्यासाठी १२ कर्मचाऱ्यांना नोटीस
निवृत्तीनंतरही कोटला कॉलनीतील घर न सोडणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांना घर रिकामे करण्यासाठी २ जुलै २०१४ रोजी शेवटची नोटीस देण्यात आली असल्याचे सेवा केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले.
गवत वाढल्याने भीती वाटते
काही घरांना गळती लागली असून, ड्रेनेज लाईन आणि पिण्याच्या पाण्याचे पाईपही अनेक ठिकाणी फुटले त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. -संगीता सुंब्रे
कुटुंबाचे आरोग्य धोक्यात
परिसरात साचलेला कचरा आणि फुटलेल्या ड्रेनेजमुळे कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने परिसराची नियमित स्वच्छता आणि निवासस्थानाची दुरुस्ती करावी. - साधना कटारे
समस्यांचा विळखा
पाणीटंचाई, अस्वच्छता, फुटलेली ड्रेनेज लाईन, वाढलेले गवत, असे अनेक प्रश्न येथे असून, या प्रश्नांना तोंड देताना नाकीनऊ येत आहे. रोज नवा प्रश्न समोर उभा ठाकतो आहे. संबंधितांना याची जाणीव आहे की, नाही काही कळतच नाही.- मुग्धा दिवाणजी