तूर उत्पादकांचा परभणीत रास्ता रोको
By Admin | Updated: June 23, 2017 23:35 IST2017-06-23T23:34:04+5:302017-06-23T23:35:30+5:30
परभणी :तूर शासनाने खरेदी करावी, या मागणीसाठी उत्पादकांनी शहरातील उड्डाणपुलावर रास्तारोको केला.

तूर उत्पादकांचा परभणीत रास्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शासनाच्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर रांगेत असलेल्या उत्पादकांची तूर शासनाने खरेदी करावी, या मागणीसाठी २३ जून रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उत्पादकांनी शहरातील उड्डाणपुलावर रास्तारोको केला.
परभणी येथे एमआयडीसी परिसरात शासनाने हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू केले होते. या ठिकाणी रांगेत असलेल्या तूर उत्पादकांच्या वाहनांना टोकन क्रमांक देखील दिले होते. मात्र अचानक १० जून रोजी हे केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे उर्वरित वाहने अजूनही या ठिकाणी रांगेत आहेत.
दरम्यान, शासनाने टोकन दिल्यामुळे रांगेत असलेल्या वाहनातील तूर खरेदी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याच मागणीसाठी हा रास्ता रोको करण्यात आला. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह पोलीस कर्मचारी आंदोलनस्थळी दाखल झाले़ त्यानंतर उड्डाणपूलावरील वाहतूक सुरळीत झाली़ या ठिकाणाहून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले़ शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवला होता़ दुपारी १ वाजेच्या सुमारास शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले़ या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना निवेदन देण्यात आले़
शासन निर्धारित वेळेत टोकन प्राप्त असलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करू शकत नसल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला़ तूर खरेदी करताना वेळोवेळी केंद्र बंद पडले़ त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे़ तेव्हा परभणी आणि गंगाखेड येथे खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी, अशी मागणी करण्यात आली़
या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, रवींद्र पतंगे, भाकपचे राजन क्षीरसागर यांच्यासह गोविंद रुद्रवार, रमेश शेरे, सुभाष देशमुख, संग्राम रेंगे, ज्ञानेश्वर मुळे, सुभाषराव देशमुख, भगवान काळे आदी शेतकरी सहभागी झाले होते़