‘मुघल महाला’ची वाताहत थांबवा!

By Admin | Updated: May 17, 2014 01:14 IST2014-05-17T01:01:03+5:302014-05-17T01:14:20+5:30

औरंगाबाद : जाधववाडी भागातील मुघल महालाची वाताहत सुरू असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महाल ताब्यात घ्यावा, अशी मागणी इतिहासतज्ज्ञ डॉ. रमजान शेख यांनी केली आहे.

Stop the 'Mughal Palace'! | ‘मुघल महाला’ची वाताहत थांबवा!

‘मुघल महाला’ची वाताहत थांबवा!

औरंगाबाद : जाधववाडी भागातील मुघल महालाची वाताहत सुरू असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महाल ताब्यात घ्यावा, तेथे डागडुजी करून पर्यटकांसाठी सुंदर बगीचा तयार करावा, अशी मागणी इतिहासतज्ज्ञ डॉ. रमजान शेख यांनी केली आहे. विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात डॉ. रमजान शेख यांनी म्हटले आहे की, केंद्र शासनाने औरंगाबादला ऐतिहासिक शहर म्हणून दर्जा दिला आहे. शहरातील ऐतिहासिक मंदिर, मशीद, महाल, बगीचे, दरवाजे यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचे दायित्व शासनाचे आहे. पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात ऐतिहासिक वास्तू हळूहळू नामशेष होत आहेत. वास्तविक पाहता ऐतिहासिक वास्तू पाडणे हा गुन्हा आहे. औरंगाबाद खंडपीठाने नहर- ए- अंबरी, नहर- ए- पाणचक्कीचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक प्रशासन याकडे गांभीर्याने बघत नाही. जाधववाडी येथील मुगलकालीन महालाचा दरवाजा आजही दिमाखात उभा आहे. या दरवाजाच्या चारही बाजूंनी संरक्षक भिंत आणि छोटे-छोटे मनोरे उभारण्यात आले आहेत. या वास्तूचे वेळीच संवर्धन होणे गरजेचे आहे. मका हबची इमारत बांधताना हे अवशेष नष्ट होण्याची दाट शक्यता आहे. महालाच्या कोणत्याही अवशेषाला धोका पोहोचणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. दुरून नहरीद्वारे येथे पाणी आणले जाऊन हौदाच्या समोरील बाजूस हे पाणी छोट्या कालव्यात पडेल, अशी व्यवस्था होती. हा कालवा ७० ते ८० फूट लांब आहे. आता बुजलेल्या कालव्याचे अवशेष दिसतात. मुख्य प्रवेशद्वाराची उत्तरेकडील बाजू तग धरून आहे. (लोकमत ब्युरो) महालाची वैशिष्ट्ये जाधववाडी बाजार संकुलाच्या पूर्वेस ५० एकराच्या परिसरात सुंदर मुघल महाल बांधण्यात आला होता. मुघल स्थापत्य कलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे. आज या महालाचे काही अवशेष व तटबंदी उभी आहे. महालाच्या उत्तरमुखी (नगारखाना) प्रवेशद्वाराचे अवशेष आढळतात. उत्तरमुखी प्रवेशद्वारासह चारही बाजूंनी तटबंदी होती. त्याच्या चारही कोपर्‍यांवर मुघल स्थापत्यशैलीतील सुंदर घुमट (डोम) होते. महालात पाणीपुरवठ्यासाठी नहरीतून पाणी येण्याची व्यवस्था करण्यात आली होती. महालाच्या पूर्वेस आजही तटबंदी उभी आहे. एक ते दीड फूट रुंद असलेल्या या मजबूत तटबंदीवरही नक्षीकाम करण्यात आले होते. याच ठिकाणी मागील बाजूस हौद बांधण्यात आला होता.

Web Title: Stop the 'Mughal Palace'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.