अवैध उपसा थांबवा
By Admin | Updated: April 8, 2017 00:05 IST2017-04-08T00:04:47+5:302017-04-08T00:05:43+5:30
बीड : शहराला माजलगाव बॅक वॉटर येथून पाणीपुरवठा होतो. बॅक वॉटरवरून सध्या अवैध पाणी उपसा केल्याचे समोर येत आहे.

अवैध उपसा थांबवा
बीड : शहराला माजलगाव बॅक वॉटर येथून पाणीपुरवठा होतो. बॅक वॉटरवरून सध्या अवैध पाणी उपसा केल्याचे समोर येत आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर बीड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. यासाठी बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन अवैध पाणी उपसा थांबवा, अशी मागणी केली.
यावेळी आरडीसी चंद्रकांत सुर्यवंशी, न.प.चे मुख्याधिकारी प्रशांत खांडकेकर, माळवदकर सहाय्यक नगररचनाकार सलीम भाई, लईक भाई आदिंची उपस्थिती होती.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी गेल्या आठवड्यात माजलगाव बँक वॉटर व पाली धरणातील शेतीसाठी होत असलेला अवैध पाणी पुरवठा बंद करण्यासंदर्भात तसेच हा उपसा बंद न झाल्यास बीड शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता असून भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास गंभीर पाणीप्रश्न निर्माण होऊ शकतो तसेच आपण संबंधित अधिकाऱ्यांना अवैध पाणी उपसा करणाऱ्या मोटारी, पंप जप्त करून अवैध उपसा बंद करण्याच्या सूचना द्याव्यात असे त्यांनी यावेळी सांगितले. माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात मोटारीने पाणी उपसा चालू असून आज रोजी धरणात केवळ ५० टक्के पाणी शिल्लक आहे. नागरिकांनी नळाला तोट्या बसवून पाण्याचा काटकसरीने वापर करून न.प.प्रशासनाला सहकार्य करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदरील निवेदन लक्षात घेऊन माजलगाव येथील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून होत असलेला अवैध पाणी उपसा थांबविण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. उन्हाळ्याचे अजून दोन महिने बाकी आहेत. या दरम्यान पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. बीड शहराच्या पाणी प्रश्नावरून नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर दक्ष असल्याचे शुक्रवारी पहावयास मिळाले. याशिवाय, बीड शहरातील गरीबांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. (प्रतिनिधी)