टेंभूर्णी : जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी येथे डोक्यात दगड घालून गोपीनाथ धुराजी गोफणे (वय ४५) या इसमाचा खून करण्यात आला. ही घटना १२ मे रोजी उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. गोपीनाथ गोफणे हे गेल्या दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. टेंभूर्णी येथील क्रांतीनगर भागात ते एकटेच राहत होते. सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह नालीत आढळून आला होता. या प्रकारामुळे खळबळ उडाली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. गोफणे यांच्या डोक्यावर, तोंडावर जखमा आढळून आल्या होत्या. त्यामुळे हा खून झाल्याचे प्राथमिक पाहणीतच निष्पन्न झाले होेते. शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी गिरीश अग्रवाल यांनी केले. उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत देशमुख यांनीही घटनास्थळी भेट दिली. प्रभारी सपोनि विनोद इज्जपवार, जमादार एस.जी. चव्हाण, देवीदास जावळे, नरहरी खार्डे यांनी तपासाची चके्र फिरवून किरण तेजराव गोफणे व दीपक तेजराव गोफणे या दोघांना अटक केली. आरोपींविरुद्ध टेंभूर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर) अपघातात एक ठार जालना - भरधाव अॅपेरिक्षा व ४०७ टेम्पोची समोरासमोर धडक होऊन रिक्षातील एकजण ठार झाला. तर अन्य काही जणांना किरकोळ जखम झाली. ही घटना बदनापूर - नानेगाव रस्त्यावरी ढोकसाळ फाट्याजवळ रविवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली. अपघातात मयत झालेल्या प्रवाशाचे नाव शेख जानेमियाँ शेख हिराजी (वय ४५ ) असे आहे. याप्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपघातातील जखमींवर प्राथमिक उपचार झाले.
डोक्यात दगड घालून इसमाचा खून
By admin | Updated: May 13, 2014 01:12 IST