शेतीच्या कारणावरून जावयाचा दगडाने ठेचून खून

By Admin | Updated: May 14, 2014 00:53 IST2014-05-14T00:45:04+5:302014-05-14T00:53:57+5:30

वाशी/ईट: शेत नावावर करून द्या, म्हणून तगादा लावणार्‍या जावयाचा सासर्‍याने डोक्यात दगड घालून खून केला़ ही थरारक घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घाटनांदूर (ता़भूम) येथे घडली.

Stone stoned to death due to farming | शेतीच्या कारणावरून जावयाचा दगडाने ठेचून खून

शेतीच्या कारणावरून जावयाचा दगडाने ठेचून खून

 वाशी/ईट: शेत नावावर करून द्या, म्हणून तगादा लावणार्‍या जावयाचा सासर्‍याने डोक्यात दगड घालून खून केला़ ही थरारक घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घाटनांदूर (ता़भूम) येथे घडली असून, सासर्‍यास पोलिसांनी अटक केली आहे़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वाशी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटनांदूर येथील उध्दव आप्पाराव हुंबे (८०) यांना तीन मुली असून, मोठ्या मुलीचा सरमकुंडी (ता़वाशी) येथील भारत बप्पासाहेब गायकवाड (४५) याच्याशी विवाह झाला होता़ उध्दव हुंबे यांना जवळपास ३० एकर जमीन आहे़ त्यांना मुलगा नसल्याने भारत गायकवाड नेहमीच ‘तुमच्या दोन्ही मुलीचे माझ्या बरोबर लग्न करा, तुमच्या नावावर असलेली जमीन मला द्या’ असा तगादा लावला होता. जावायाच्या या त्रासास कंटाळून गेल्यावर्षी हुंबे यांनी जावयास कुळवाच्या लोखंडी पासाने डोक्यात वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यात गायकवाड हा गंभीर जखमी झाला होता़ त्याप्रकरणी हुंबे यांच्याविरूध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. जावई भारत गायकवाड हा सोमवारी घाटनांदूर येथील सासरवाडीत मुक्कामास गेला होता़ त्यावेळी ‘मला तुमच्या दोन्ही मुलीबरोबर लग्न करायचे आहे तसेच तुमच्या नावावर असलेली शेत जमीनही मला द्या किंंवा माझ्या मुलाच्या नावावर करा’ असा तगादा रात्रीच लावला. सतत होत असलेल्या तगाद्यास वैतागलेल्या हुंबे यांनी जावई गायकवाड हा झोपेत असतानाच मंगळवारी पहाटेच्या सुमारास मोठा दगड त्याच्या डोक्यात घालून गावालगतच्या डोंगरात पलायन केले. घटनेनंतर सासू व इतरांनी गायकवाड यास बार्शी येथील डॉ.मामासाहेब जगदाळे हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी बार्शी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे़ भारत गायकवाडचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृत्यू हा डोक्यात जबर मार लागल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दीपक कांबळे, सहा.पो.नि. विनोद मेत्रेवार हे सहकार्‍यांसह घटनास्थळी पोहोचले़ अप्पर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे यांना माहिती दिली़ वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपासास लागलीच प्रारंभ करून उध्दव हुंबे यांना गावालगतचा डोंगर पालथा घालून अटक केली़ हुंबे यांनी भारतच्या खुनाची कबुली दिली असून पहिली मुलगी दिली असताना माझ्या इतर दोन अविवाहित मुलीची लग्ने माझ्याबरोबर करून द्या व तुमची जमीन मला द्या असे तो वारंवार म्हणत असल्यामुळे त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा मी खून केला असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले़ घाटनांदूर येथील पोलीस पाटील अरूण गोविंदराव हुंबे यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती. (वार्ताहर) दोन प्रकरणे न्यायप्रविष्ट भारत गायकवाड याने जानेवारी १४ मध्ये त्याच्या शेताशेजारील भावकीच्या माणसाचा वाटणीच्या कारणावरून खून केला होता. त्याच्यावर व त्याच्या मुलासह इतर दोघावर खुनाचा गुन्हा दाखल असून सदरील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तर जावई भारत गायकवाड हा यापूर्वीही शेती नावावर करण्याची मागणी करत दुसर्‍या दोन्ही मुलीशी लग्ने लावून द्या म्हणून तगादा लावत असल्याने संतापलेल्या उद्धव हुंबे यांनी गायकवाड याला जबर मारहाण केली होती. हे प्रकरणही न्यायप्रविष्ट आहे.

Web Title: Stone stoned to death due to farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.