चोरीच्या ३२ दुचाकी जप्त; चौघांना अटक
By Admin | Updated: August 1, 2014 00:26 IST2014-08-01T00:01:47+5:302014-08-01T00:26:15+5:30
लातूर : शहरातील क्रीडासंकुल, शिवाजी चौक, पाच नंबर चौक, दयानंद गेट, बसस्थानक आदी ठिकाणी कामानिमित्त आलेल्या नागरिकांच्या दुचाकीची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे़

चोरीच्या ३२ दुचाकी जप्त; चौघांना अटक
लातूर : शहरातील क्रीडासंकुल, शिवाजी चौक, पाच नंबर चौक, दयानंद गेट, बसस्थानक आदी ठिकाणी कामानिमित्त आलेल्या नागरिकांच्या दुचाकीची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे़ याप्रकरणातील चार आरोपींना गजाआड करुन त्यांनी चोरलेल्या ३२ दुचाकी जप्त केल्या आहेत़
लातुरातील पीव्हीआर सिनेमागृहात एक व्यक्ती वाहनांशी छेडछाड करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्यानंतर गांधी चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी़आऱसोनटक्के यांच्या सूचनेनुसार संजय फुलारी, राम बनसोडे, पोक़ॉ नागेश कारेवाड यांनी बीड जिल्ह्यातील धारुर येथील आरोपी गणेश कादे यास चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले़ अधिक चौकशी केली असता त्याने इतर ३ साथीदारांचीही माहिती दिली़ त्यानुसार गणेशचे साथीदार आरोपी कृष्णा श्रीरंग सोनटक्के धारूर जि़बीड, आप्पासाहेब बलभीम क्षीरसागर रा़वैराग जि़ सोलापूर व रणजित उर्फ गुरूनाथ शिवाजी तांबारे रा़ उपळे ता़बार्शी जि़सोलापूर यांनाही सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस उपनिरीक्षक धनवे व कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले़
या सर्वांचीच कसून चौकशी केली असता त्यांनी लातूर शहरासह विविध भागातून तब्बल ३२ दुचाकी चोरल्याचे कबूल केले़ पोलिसांनी त्यांना सोबत घेऊन वाहने विक्री केलेल्या ठिकाणी जाऊन दुचाकी जप्त केल्या आहेत़ या दुचाकींची किंमत जवळपास १२ लाख रुपये असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली़ (प्रतिनिधी)