दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा

By Admin | Updated: July 15, 2014 00:55 IST2014-07-14T23:29:16+5:302014-07-15T00:55:40+5:30

शेवगा : पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेवगा परिसरात अजूनही सरसकट पेरण्या झालेल्या नाहीत. शेतकरीवर्ग अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Still awaited strong rains | दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा

दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा

शेवगा : पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेवगा परिसरात अजूनही सरसकट पेरण्या झालेल्या नाहीत. शेतकरीवर्ग अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
शेवगा व परिसरात पावसाअभावी शेतकरी चिंताग्रस्त आहेत. गेल्या दोन वर्षांपासून बळीराजाचे मोठे हाल होत आहेत. परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांनी काबाडकष्टातून आपापल्या फळबागा जगविल्या. परंतु आज या पावसाच्या लहरीपणामुळे त्याचे परिणाम फळबाग पूर्णत: नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच परिसरात पूर्ण व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. परिसरात मजुरांनाही काम नसून रोजगार कामानिमित्त ते बाहेर पडत आहेत. तर काही जण आपल्या उदरनिर्वाहासाठी लिंबुळी वेचणीकडे वळले आहेत. लिंबुळीचा भाव पाचशे ते आठशे रुपये क्ंिवटल असून महिला मजुरांचा लिंबुळीकडे मोठा कल दिसून येत आहे. विशेषत: लहान मुलेही शाळेला दांडी मारुन लिंबुळ्या वेचण्यासाठी जात आहेत.
जिल्ह्यातील शेतकरी चिंतातुर
जामवाडी : मृगनक्षत्र संपत आले तरी पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांनी आता देवाकडे धावा केला आहे. जामवाडी येथील ग्रामस्थांनी पाऊस लवकर पडावा यासाठी धम्मसेवकाच्या वतीने सर्व गावात खीरदान वाटप करण्यात आले. गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून धम्मसेवक श्यामलाल लांडगे, गौतम लांडगे, प्रकाश लांडगे, अ‍ॅड प्रमोद लांडगे यांनी खीरदान केले आणि पाऊस लवकर पडावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
हस्तपोखरी : संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडत नसल्याने शेतकरी वर्ग चिंतातून झाला आहे. त्यातच जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. संपूर्ण तालुक्यात कृषीविभागाने वैरण विकास कार्यक्रम राबविण्याची मागणी परिसरातील धनगर पिंपरी, हारतखेडा, शेवगा, मसई, वाघलखेडा,सारंगपुरा, बोरी, दुधपुरी, दहीपुरी, आदी गावातून होत आहे. या भागात झालेल्या गारपिटीने ज्वारीचा कडबा काळा पडल्याने तो गुरांच्या खाण्यायोग्य राहिला नाही. ज्वारी, गहू, हरभरा सोयाबीन यांचा भुसा यावर्षी मिळालाच नसल्याने यावर्षी परिसरात गुरांच्या चारा मिळणे जिकिरीचे बनले आहे. कृषी विभागाने गतिमान वैरण विकास कार्यक्रम प्रभाविपणे राबविणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
चारा नसल्याने पन्नास हजाराची बैलजोडी तीस हजाराला विकावी लागत असल्याचे शेतकरी सांगत आहे. (वार्ताहर)
निसर्गावरच पावसाचा अंदाज
अकोलादेव : हवामान खाते कितीही प्रगत झाले असले तरी ग्रामीण भागामध्ये मात्र बहुतांश शेतकरी हे निर्सगाच्या घडणाऱ्या हालचालीवरच आपला पावसाचा अंदाज आतापर्यंत बांधत आला आहे. आजही शेतकऱ्यांचा यावर मोठा विश्वास आहे.
यंदा मात्र शेतकऱ्यांना पूर्व सूचना देणाऱ्या पेरते व्हा..पेरते व्हा.. या पावशा पक्ष्याचा रानावनात घुमणारा आवाज यंदा ऐकू आला नाही. आणि सकाळीच कानावर येणारे कोकिळाचे मधुर स्वर ऐकण्यास मिळाले नाही. आणि दरवर्षी अतिथी म्हणून येणारा पावशा पक्ष्याचे आगमन झाले नाही. पावसाच्या थेंबाथेंबावर जीवन जगणारा चातक पक्षी पावसाळा उलटून चालला तरी दिसेनासा झाल्याने शेतकऱ्यात पाऊस पडेल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कारण गेली अनेक वर्षे या बाबीवर विश्वास ठेवणाऱ्या शेतकऱ्यात चिंता वाढली आहे.
शेतकरी चातक पंक्षाच्या पेरते व्हा.. पेरते व्हा.. या सारखा आवाज काढतो.यावर शेतकरी या वर्षी लवकर पाऊस पडणार या आशेवर शेतीच्या मशागतीला सुरवात करतो. परंतु चातक पक्षीच दिसेनासा झाला आहे. ग्रामीण भागात आजही जुनी जाणकार मंडळी सांगतात की मृगनक्षत्रात बेडकांचे ड्रॉव ड्रॉव ओरडणे शेतामध्ये पैसा सारखा दिसणारा गोलाकार वाणू, लाल गोगलगाय, आणि कावळ्यांनी वडाच्या झाडाला मध्यभागी बांधलेले घरटे, हे सर्व येणाऱ्या पावसाचे संकेत म्हणून आजही ग्रामीणभागात यावर मोठा विश्वास आहे. मात्र यावर्षी निसर्गात होणाऱ्या बदलाचे कुठलेच संकेत दिसले नाही. यावर्षी कमी पाऊस पडेल असा अंदाज माहीत असून सुध्दा शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज बाधता आला नाही. आणि काही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. तरी सुध्दा परिसरातील शेतकरी, पुरोहित अशोक जोशी, रामचंद्र लंगोटे पाऊस पडेल या आशेने निसर्गाच्या हालचालीकडे लक्ष ठेवून आहेत.
पावसाने मारली दडी.. शेतकऱ्याला भरली हुडहुडी
शेवगा : कधी नव्हे ते रबी पीक काढण्याच्या मोक्यावर असताना उभा शेतकऱ्यांचा माल गारपिटीने जमीनदोस्त झाला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले. शेतकरी आपल्या नुकसानीचे दु:ख उरात दाबून सरकारच्या उत्साहात सामील झाला. आमचा शेतकरी दुसऱ्याच्या सुखात सुखावतो. दुसऱ्याच्या दु:खाने दु:खी होतो. पण शेतकऱ्याच्या सुखदु:खात कुणी सामील होत नाही. आजही अनेक शेतकऱ्यांना गारपिटीचे पैसे मिळालेले नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी तहसील व बँकांचे उंबरठे झिजविले मात्र, उपयोग झालेला नाही. आता अनुदानाची अथव मदतीची रक्कम कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.
शेतात पेरल्यानंतर चांगले पीक येईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असते.या भरोशावर तो मोठी स्वप्ने रंगवितो. उगवणीपासून काढणीपर्यंत मोठा खर्च होतो. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे सर्वच होत्याचे नव्हते होत असल्याचे गत तीन ते चार वर्षांपासूनचे चित्र आहे.
जालना जिल्ह्यात अद्याप एकाही मोठा पाऊस न झाल्याने पाणीटंचाईची समस्या तीव्र बनली आहे. अनेक गावातील विहिरी तसेच कूपनलिकांची पाणीपातळी खोलवर गेली आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. अनेक गावातील टँकरचे प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावात शासनाने तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. विहिरी व कूपनलिका उन्हाळ्यातच कोरड्याठाक पडल्या आहेत. मोठा पाऊस न झाल्याने त्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही. मोठा पाऊस न पडल्यास आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. लघू व मध्यम तलावात जेमतेम पाणी आहे. जनावरांना पाणी पाजण्यासाठी दूरवर न्यावे लागत आहे. यात सर्वांची मोठी कसरत होत आहे.
जुलैचा दुसरा आठवडाही कोरडाठाक
नेर : जिल्ह्यात खरीप पीकपूर्व मशागत पूर्ण झाली असली तरी नेर, टाकरवण, शेवगा, शिवणी, सावंगी, काकडा, मोहाडी या परिसरात अद्याप पावसाच्या किरकोळ सरी वगळता मोठा पाऊस नसल्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मोठ्या पावसाशिवाय मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांची पेरणी करता येत नाही. त्यामुळे बाजारपेठेतही चांगला पाऊस झाल्याशिवाय आर्थिक व्यवहार सुरळीत होणार चर्चा बाजारपेठेत आहेत. पावसाने असाच दगा दिल्यास नेर परिसरातील शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याची प्रतिक्रिया सरपंच कैलासराव सहाने, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष द्वारकादास बजाज, प्रगतशील शेतकरी भागवतराव उफाड, रमेशराव गाते यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Still awaited strong rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.