स्टील बॉडीची एसटी महामंडळात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:35 IST2017-08-31T00:35:08+5:302017-08-31T00:35:08+5:30
एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात पहिली स्टील बॉडीची (माइल्ड स्टील) एसटी दाखल झाली आहे. सिडको बसस्थानकास ही बस प्राप्त झाली असून, बुधवारी (दि. ३०) औरंगाबाद-शिर्डी बससेवा सुरू करण्यात आली.

स्टील बॉडीची एसटी महामंडळात दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात पहिली स्टील बॉडीची (माइल्ड स्टील) एसटी दाखल झाली आहे. सिडको बसस्थानकास ही बस प्राप्त झाली असून, बुधवारी (दि. ३०) औरंगाबाद-शिर्डी बससेवा सुरू करण्यात आली.
बससेवेच्या उद््घाटनप्रसंगी विभाग नियंत्रक आर. एन. पाटील, सिडको बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक ए. यू. पठाण आदी उपस्थित होते. पुण्यातील दापोडी कार्यशाळेत या बसची बांधणी करण्यात आली आहे.
आकर्षक रंगसंगतीबरोबर आरामदायक प्रवासासाठी विविध सोयी-सुविधा या बसमध्ये आहेत. आरामदायक आसन व्यवस्था, चालकाजवळ माइक व स्पीकर, डिजिटल मार्ग फलक, आपत्कालीन अलार्म, मोठ्या आकाराच्या खिडक्या ही या बसची वैशिष्ट्ये आहेत.
साध्या बससेवेचा (लालबस) तिकीटदरच या बससाठी आकारण्यात येत आहे, अशी माहिती ए. यू. पठाण यांनी दिली.
दुसरीकडे एसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतही स्टील बॉडीच्या बांधणीला सुरुवात झाली आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने अॅल्युमिनियमऐवजी स्टील बॉडीमध्ये बांधण्यात येणारी ही एसटी हळूहळू आकार घेत आहे.