शेतकऱ्यांचा भूम येथील बाजार समितीतच मुक्काम
By Admin | Updated: January 6, 2017 00:25 IST2017-01-06T00:23:20+5:302017-01-06T00:25:18+5:30
भूम : शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत कुडकुडत बाजार समितीच्या आवारातच मुक्काम ठोकावा लागत आहे.

शेतकऱ्यांचा भूम येथील बाजार समितीतच मुक्काम
भूम : कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या गैरसोयीचे नाव पुढे करीत आधारभूत दराने तूर खरेदी केली. परंतु, दराची ‘हमी’ असेल्याने अनेक शेतकरी येथे तूर घेवून आले आहेत. दोन ते तीन दिवस तुरीची मापे होत नाहीत. आणि सुरक्षा रक्षकही नेमलेले नसल्याने वऱ्हाहांकडून तुरी फस्त केल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत कुडकुडत बाजार समितीच्या आवारातच मुक्काम ठोकावा लागत आहे. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
खाजगी बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी होत होती. ही बाब लक्षात घेवून बाजार समितीने आधारभूत तूर खेरदी केले सुरू केले. परंतु, बाजार समितीतील काटा संथ गतीने सुरू आहे. सध्या तुरीची आवकड मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वजन-काट्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. परंतु, बाजार समितीकडून याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. परिणामी शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतीमालाचे वजनमाप वेळेवर होत नाही. त्यामुळे दोन ते तीन दिवस शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारातच मुक्काम ठोकावा लागत आहे. मुक्काम न केल्यास परिसरातील वऱ्हाहांकडून तूर फस्त केली जात आहे. हे प्रकार टाळण्यासाठी बाजार समितीने सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे अपेक्षित आहे. परंतु, त्या अनुषंगाने बाजार समितीकडून कुठल्याही स्वरूपाची पाऊले उचलली जात नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एकूणच एकीकडे शेतकरी नोटबंदीने त्रस्त असताना दुसरीकडे बाजार समितीकडून तरी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असताना उलट शेतकऱ्यांना गैरसोयीचाच सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)