स्टाइल में रहनेका! युनिसेक्स पार्लरची वाढतेय क्रेझ, एकाच सलूनमध्ये ठरते संपूर्ण कुटुंबाची फॅशन
By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 16, 2023 15:46 IST2023-01-16T15:45:30+5:302023-01-16T15:46:47+5:30
सहकुटुंबाचं एकाच ठिकाणी कटिंग, फेशियल : शहरात युनिसेक्स पार्लरची वाढतेय क्रेझ

स्टाइल में रहनेका! युनिसेक्स पार्लरची वाढतेय क्रेझ, एकाच सलूनमध्ये ठरते संपूर्ण कुटुंबाची फॅशन
औरंगाबाद : पती, पत्नी, मुलगा, मुलगी असे कुटुंबातील सर्व सदस्य एकाच ठिकाणी आरामदायी खुर्चीवर बसून हेअर कट, फेशियल, हेअर कलर करीत आहेत, ही काही परिकल्पना नाही. तर हे सत्यात उतरले आहे. अशा युनिसेक्स सलूनच्या संख्येने चाळिशीचा आकडा ओलांडला आहे. वीकेण्डला अख्खे कुटुंबच या आधुनिक सलूनमध्ये जाऊन आपले सौंदर्य निखारते. यामुळे पुरुषांसाठी स्वतंत्र सलून व फक्त महिलांसाठी ब्युटी पार्लर ही पारंपरिक व्यवसायाची संकल्पना मागे पडून त्याची जागा आलिशान ‘फॅमिली सलून’ घेत आहे.
ब्रँडेड सलून
शहरात ब्रँडेड सलूनची संख्या वाढत आहे. याच काॅर्पाेरेट कंपन्यांनी ‘फॅमिली सलून’ची कल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे. आजघडीला शहरात ४० पेक्षा अधिक लहान-मोठे ‘फॅमिली सलून’ सुरू आहेत. त्यातील १० सलून ब्रँडेड आहेत.
प्रशिक्षित तज्ज्ञ स्टाफ
ब्रँडेड सलूनमध्ये प्रशिक्षित तज्ज्ञ स्टाफ सेवा देत आहेत. ग्राहकांचे स्वागत करण्यापासून त्यांना चहा, कॉफी, पाणी देणे, नंतर हेअरवॉश करून मग चेहऱ्याला साजेल, अशी कटिंग व केसाला रंग लावून देण्यापर्यंत कर्मचारी सेवा देतात.
कटिंग २५०, महिलांचे हेअरकट ५०० रुपयात
या फॅमिली सलूनमध्ये पुरुषांची कटिंग २५० रुपये, हेअरकट ॲडव्हान्स ४०० रुपये, १० वर्षांवरील मुलांची कटिंग २०० तर मुलींचे हेअरकट ३५० रुपयांपासून, महिलांचे हेअरकट व हेअर वॉश ५०० रुपये, हेअर स्टायलिंग १,२०० रुपयांपासून पुढे दर आकारले जात आहेत.
नवरदेव, नवरी मेकअप करून थेट विवाहस्थळी
लग्नतिथीच्या एक महिने आधीपासून नवरदेव व नवरीचे फॅमिली सलूनमध्ये येणे सुरू होते. गुमिंग प्री पॅकेज, ब्रायडल प्री पॅकेज यासाठी असते. हेअर स्टाइलपासून ते लेन्सपर्यंत चेहऱ्याचा कायापालट केला जातो. लग्नाच्या दिवशी येथे मेकअप करूनच वधू-वर विवाहस्थळी जातात. यासाठी पाच ते ५० हजारांपर्यंतचे पॅकेज असते.
३० ते ४० लाखांची उलाढाल
शहरातील सर्व ४० ‘फॅमिली’ सलून मिळून महिन्याकाठी ३० ते ४० लाखांची उलाढाल होते. श्रीमंत तर आहेच; पण नवश्रीमंत कुटुंब या फॅमिली सलूनमध्ये जाणे पसंत करीत आहेत.
- किशन लिंगायत, मालक, फॅमिली सलून