१५ व्या शतकातील श्रीरामाची मूर्ती
By Admin | Updated: April 15, 2016 01:50 IST2016-04-15T01:30:33+5:302016-04-15T01:50:59+5:30
औरंगाबाद : किराडपुऱ्यातील श्रीराम मंदिराचा २० वर्षांपूर्वी जीर्णोद्धार झाला आहे. मात्र, येथे पूर्वी श्रीरामाचे सागवानापासून तयार केलेले प्राचीन मंदिर होते.

१५ व्या शतकातील श्रीरामाची मूर्ती
औरंगाबाद : किराडपुऱ्यातील श्रीराम मंदिराचा २० वर्षांपूर्वी जीर्णोद्धार झाला आहे. मात्र, येथे पूर्वी श्रीरामाचे सागवानापासून तयार केलेले प्राचीन मंदिर होते. ते मंदिर महाराजा जसवंतसिंग यांनी बांधले होते. त्यावेळी महाराजा श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्तीची पूजा करीत होते, त्या १५ व्या शतकातील मूर्र्तींचे आजही जतन करण्यात येते.
किराडपुरा परिसर ऐतिहासिक आहे. कारण १६६२ ते १६६५ या काळात महाराजा जसवंतसिंग या परिसरात राहत होते. त्यांनीच येथे श्रीराम मंदिर उभारले होते. त्यावेळी सागवानी लाकडाचे हे मंदिर होते. येथे श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान व गरूडराज, याशिवाय श्री बालाजी भगवंत, लक्ष्मीनारायण भगवंतांच्या मूर्ती आहेत. श्रीरामाचे मंदिर १६६२ नंतर बांधलेले असले तरीही मंदिरातील देवांच्या मूर्ती या १५ व्या शतकातील असल्याचा उल्लेख पुरातत्व खात्याकडे आहे. इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या या मूर्ती मंदिर ट्रस्टने जपून ठेवल्या आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मंदिराची देखभाल महाराष्ट्र शासनाने केली.
१९८८ साली या मंदिराची जबाबदारी सरकारने श्रीरामचंद्र मंदिर (मठ) ट्रस्टकडे दिली. माजी खा.बाळासाहेब पवार हे या ट्रस्टचे पहिले अध्यक्ष बनले. त्यावेळी लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल, बाळासाहेब सीमंत, मोरेश्वर सावे, बाबूराव जाधव, प्रभाकरदादा पुराणिक हे विश्वस्त होते. १९९३ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. आज येथे श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमानाच्या संगमरवरी ५ फुटांपेक्षा अधिक
उंच मूर्ती येथे बसविण्यात आल्या आहेत.