राज्य प्रिस्क्रिप्शनमुक्त बनवणार - शेट्टी
By Admin | Updated: July 22, 2014 00:17 IST2014-07-21T23:43:49+5:302014-07-22T00:17:59+5:30
जालना : गेल्या चार वर्षात आरोग्य विभागाने राज्यात काही क्रांतिकारी निर्णय घेतलेले असून आता राज्याला प्रिस्क्रीप्शनमुक्त बनविण्यासाठी सरकारने पाऊले उचलली आहेत

राज्य प्रिस्क्रिप्शनमुक्त बनवणार - शेट्टी
जालना : गेल्या चार वर्षात आरोग्य विभागाने राज्यात काही क्रांतिकारी निर्णय घेतलेले असून आता राज्याला प्रिस्क्रीप्शनमुक्त बनविण्यासाठी सरकारने पाऊले उचलली आहेत, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी येथे केले.
जुना जालन्यातील गांधी चमन येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाचे भूमिपूजन शेट्टी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी १६ अत्याधुनिक रुग्णवाहिकांचे लोकार्पणही करण्यात आले. राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या लाभार्थींचे स्वागतही करण्यात आले.
अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजेश टोपे होते. यावेळी पशु, दुग्ध व मत्स्य व्यवसायमंत्री अब्दूल सत्तार, आ. कैलास गोरंट्याल, आ. सुरेश जेथलिया, आ. संतोष सांबरे, आ. सुभाष झांबड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, अब्दूल हाफिज, उपनगराध्यक्ष शाह आलमखान, एकबाल पाशा, अर्जुन गेही, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, जिल्हा स्त्री रुग्णालयात दररोज २५० रुग्ण उपचारासाठी येतात. वाढत्या संख्येमुळे येथे २०० बेडचे रुग्णालय गरजेचे आहे. आ. गोरंट्याल म्हणाले की, निजामकालीन इमारत जीर्ण झाल्याने जिल्ह्यातून उपचारासाठी येणाऱ्या महिलांना स्त्री रुग्णालयात त्रास सहन करावा लागत होता. गेल्या चार वर्षांपासून स्त्री रूग्णालयाची नवीन इमारत बीओटी तत्वावर तयार करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्यात यश मिळाले नाही. अखेर सरकारने निधी दिला. (प्रतिनिधी)