शहरात पाणीपुरवठ्याचे शटडाऊन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:31 IST2017-10-07T00:31:11+5:302017-10-07T00:31:11+5:30

शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून शहरात पाणी येणे बंद झाले असून, मनपाने अचानक हे शटडाऊन घेतल्याने औरंगाबादकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. रविवारपर्यंत हा त्रास सहन करावा लागणार आहे.

 Start water shutdown in the city | शहरात पाणीपुरवठ्याचे शटडाऊन सुरू

शहरात पाणीपुरवठ्याचे शटडाऊन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जायकवाडीपासून शहरापर्यंत ठिकठिकाणी दुरुस्ती करणे, जलशुद्धीकरणातील गाळ काढण्यासाठी ३६ तासांचा मेगा शटडाऊन घेतला आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून शहरात पाणी येणे बंद झाले असून, मनपाने अचानक हे शटडाऊन घेतल्याने औरंगाबादकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. रविवारपर्यंत हा त्रास सहन करावा लागणार आहे.
महापालिकेच्या जायकवाडी येथील पाणीपुरवठा केंद्रात वीज वितरण कंपनीने शुक्रवारी सकाळी ११ ते १ यावेळेत फक्त दोन तासांचा शटडाऊन घेतला. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वीज कंपनीचे ३६ तासांचे शटडाऊन असल्याचे सांगून पाणीपुरवठा बंद केला. वास्तविक पाहता वीज कंपनीने एवढा मोठा खंड काळ मनपाकडे मागितलाच नाही. गुरुवारी वीज कंपनीने खुलासा करून महापालिकेचे पितळ उघडे केले. यापूर्वीही एकदा जायकवाडीत महापालिकेने वीजपुरवठ्यावर खापर फोडले होते. महापालिकेचा हा खोटारडेपणा वारंवार उघडकीस येत आहे.
शुक्रवारी सायंकाळी पुन्हा पालिका प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जाहीर करीत शटडाऊनसाठी महावितरणचेच नाव पुढे केले. सिद्धार्थ जलतरण तलाव दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळीही मनपाने पुन्हा वीज कंपनीवरच खापर फोडले आहे.
शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून शटडाऊन सुरू होताच फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. ८०० मि.मी. व्यासाच्या वाहिनीची डागडुजी करण्याचे कामही हाती घेतले आहे. रिसायकल युनिटचीही स्वच्छता केली जात आहे. फिडरवरील १७ वॉलची दुरुस्तीही केली जात आहे. ढोरकीन येथे २४ लाख लिटर पाणी क्षमतेच्या जलकुंभातील गाळ काढला जात आहे, तर जायकवाडी पंपगृहाच्या ठिकाणी ३ ठिकाणी वेल्डिंगचे काम हाती घेतले आहे. शहरात रेल्वेस्टेशन परिसर, पदमपुरा टाकसाळी मंगल कार्यालय आदी ठिकाणी जलहिनीच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी दिली.

Web Title:  Start water shutdown in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.