एसडीएमवर दगडफेक

By Admin | Updated: January 9, 2015 00:49 IST2015-01-09T00:27:22+5:302015-01-09T00:49:58+5:30

हसनाबाद : वाळूचा अवैध उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यावर वाळू माफियांनी दगडफेक केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली

Stalker on SDM | एसडीएमवर दगडफेक

एसडीएमवर दगडफेक


हसनाबाद : वाळूचा अवैध उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यावर वाळू माफियांनी दगडफेक केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. जानेफळ शिवारातील या थरार नाट्यानंतर पोलिसांनी एकास अटक करून दोन वाहनांसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भोकरदन तालुक्यातील जानेफळ शिवारात गिरजा नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना मिळाली होती. वाहनाद्वारे गेले की वाळू माफियांना त्याची माहिती होते व ते फरार होतात. त्यामुळे मिश्रा यांनी बुधवारी रात्री ११ वाजता चक्क दुचाकीवरून वाळू पात्रात प्रवेश केला. पाठोपाठ त्यांच्या मदतीला महसूल पथकातील तलाठी एन.पी कटारे, आर. पी. कांबळे, एस.ई खांडेभराड, तुषार औटी हेही दुचाकीवरूच दाखल झाले.
त्यावेळी वाळू उपसा करणाऱ्यांनी अंधारातच या पथकावर दगडफेक करण्यास सुरूवात केली. तसेच काही जणांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दुचाकीचे प्लक काढून पसार झाले. प्रसगांवधान राखून मिश्रा यांनी हसनाबाद पोलिसांना याची माहिती दिली. तेव्हा तात्काळ पोनि. मुकुंद कुलकर्णी हे आपल्या फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी मध्यरात्रीच एकास अटक केली. दोन वाहने व वाळू असा ८ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी महसूल पथकातील तुषार औटी यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक अंकुश सांडू जीवरग, सतीश काश्ीनाथ मिसाळ (रा. जानेफळ दाभाडी), रमेश शंकर दानवे (रा. हसनाबाद),सोमिनाथ इंगळे या चार जणांविरूद्ध वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दगडफेक करून हल्ला केल्याने संबंधितांवर शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
एकाला पोलिस कोठडी
मध्यरात्रीच्या दगडफेक व भागंभागच्या थरार नाट्यात पोलिसांनी सतीश काशिनाथ जीवरग यास अटक केली होती. त्यास आज न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक कुलकर्णी यांनी दिली. (वार्ताहर)

भोकरदन - या संबधी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले की, सरकारी वाहनाने कारवाईसाठी गेल्यास संबंधित वाळू चोरी करणाऱ्यांना त्याची माहिती मिळते व वाहने पाहताच ते पसार होतात. त्यामुळे कारवाई यशस्वी होत नसल्याने रात्री आम्ही दुचाकीवरून कारवाईसाठी गेलो, आणि ही घटना घडली. या पूढे कोणाच्याही दबावाला बळी न पडता अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
दुचाकीवरून आलेल्या उपविभागीय अधिकारी व त्यांच्या पथकांवर वाळू माफियांनी सुरू केलेल्या दगडफेकीच्या थरार नाट्यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र वाळू माफियांनी चक्क दुचाकींचे प्लग काढण्यापर्यंत मजल मारली. तसेच पथकातील काही सदस्यांवर दंबगगिरी दाखवली. हसनाबाद पोलिस ठाण्याचे पोनि. मुकुंंद कुलकर्णी व त्यांचे पथक वेळीच घटनास्थळी दाखल झाले नसते तर मोठा अनर्थ घडला असता अशी चर्चा हसनाबाद परिसरात आहे.

Web Title: Stalker on SDM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.