झेंड्यावरून पोलिसांवर दगडफेक
By Admin | Updated: April 22, 2015 00:38 IST2015-04-22T00:25:52+5:302015-04-22T00:38:08+5:30
भोकरदन : बोरगाव जहांगीर येथील ग्रामपंचायतच्या टॉवरवर लावण्यात आलेला झेंडा काढण्यावरून जमावाने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली

झेंड्यावरून पोलिसांवर दगडफेक
भोकरदन : बोरगाव जहांगीर येथील ग्रामपंचायतच्या टॉवरवर लावण्यात आलेला झेंडा काढण्यावरून जमावाने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. या घटनेत दोन पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. ही घटना २० एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी ६० जणांविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या ग्रामपंचायतीच्या टॉवरवर दोन वेगवेगळे झेंडे लावण्यात आले होते. या झेंड्यांवरून गावात वाद होण्याची शक्यता निर्माण झाल्याने सोमवारी भोकरदन ठाण्यातील पोलीस एका वाहनासह तेथे पोहोचले. कोणताही झेंडा टॉवरवर लावला जाणार नाही, असे पोलिसांनी दोन ठिकाणी घेतलेल्या स्वतंत्र बैठकांमध्ये ठरले. उन्हाच्या तीव्रतेमुळे सायंकाळी टॉवरवर जाऊन झेंडा काढण्याचेही ठरले होते. मात्र सायंकाळपर्यंत एक झेंडा काढण्यात आला नाही. त्यामुळे याच मुद्यावरून वाद होऊन सुरूवातीला ग्रामसेवक दिनेश अहिरे यांना काही जणांनी धक्काबुक्की केली. ग्रामसेवकांनी पोलीस अधिकारी आल्यानंतर झेंडा काढला जाईल, असे सांगितले. रात्री ८ च्या सुमारास पोलीस वाहनासह परत गावात आले. त्यावेळी जमावाने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. वाहनांच्या काचाही फोडल्या. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या घटनेत पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर अंतरफ, पोलीस उपनिरीक्षक विकास कोकाटे, ग्रामसेवक दिनेश अहिरे, पोलीस कर्मचारी विजय बहुरे, लक्ष्मण चौधरी हे जखमी झाले.
याप्रकरणी आरोपी कृष्णा कुदर, रामेश्वर कुदर, नारायण दळवी, सखाराम कुदर, श्रीराम लोखंडे, बबन कुदर, संदीप कुदर, अनिल कुदर आदी ६० जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.