आचारसंहितेच्या धसक्याने प्रस्तावांचा ढीग
By Admin | Updated: July 26, 2014 00:38 IST2014-07-26T00:00:11+5:302014-07-26T00:38:25+5:30
बीड : आचारसंहितेच्या धसक्याने जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आमदार निधीतून करावयाच्या विकास कामांसाठीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले आहेत.

आचारसंहितेच्या धसक्याने प्रस्तावांचा ढीग
बीड : आचारसंहितेच्या धसक्याने जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आमदार निधीतून करावयाच्या विकास कामांसाठीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले आहेत. त्याला अद्याप मंजुरी मिळाली नसली तरी तांत्रिक बाबींची पूर्तता करून कोणत्याही परिस्थितीत आचारसंहिता लागण्यापूर्वीच विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी सर्वजणच उतावीळ झाल्याचे दिसत आहे.
आमदार निधीतून विकास कामे करण्यासाठी दरवर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणारे प्रस्ताव हे साधारणपणे दिवाळीनंतरच येतात. यावेळी मात्र तोंडावर आलेली विधानसभा निवडणूक आमदारांना ‘लगीनघाई’ करण्याला भाग पाडत आहे. जे प्रस्ताव आलेले आहेत, त्यामध्ये सामाजिक सभागृह आणि सिमेंट रस्त्यांचेच प्रस्ताव सर्वाधिक असून अनेक कार्यकर्तेही आमदारांची विकासकामासाठीचे पत्र घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहेत.
बीड मतदारसंघातून १ कोटी ८१ लाख ८० हजार रूपयांची कामे प्रस्तावित आहेत. गेवराई मतदारसंघातून १ कोटी ८ लाख रुपयांच्या विकास कामांचे प्रस्ताव आलेले आहेत. माजलगाव मतदारसंघातून १ कोटी १३ लाख दहा हजार रुपयांच्या विकास कामांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. आष्टी मतदारसंघातून २० लाख, केज मतदारसंघातून ४७ लाख आणि परळी मतदारसंघातून ५ लाख रूपयांच्या कामाचे प्रस्ताव आलेले आहेत. यापैकी परळी मतदारसंघातील पाच लाखांच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. इतर सर्व प्रस्ताव या ना त्या कारणाने रखडलेले आहेत. अनेक प्रस्तांवाचे इस्टीमेट मागविण्यात आले असून या तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर सर्व प्रस्तावांना मंजुरी देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़ (प्रतिनिधी)