एसटी’अभावी एका पिढीने घेतले पायीच शिक्षण!
By Admin | Updated: August 4, 2014 01:56 IST2014-08-04T01:35:03+5:302014-08-04T01:56:53+5:30
राजू दुतोंडे , सोयगाव देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली; तरीही सोयगाव तालुक्यातील माळेगाव-पिंप्री गावात अद्याप एसटी महामंडळाची बस पोहोचलेली नाही.

एसटी’अभावी एका पिढीने घेतले पायीच शिक्षण!
राजू दुतोंडे , सोयगाव
देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली; तरीही सोयगाव तालुक्यातील माळेगाव-पिंप्री गावात अद्याप एसटी महामंडळाची बस पोहोचलेली नाही. आतापर्यंत चांगल्या रस्त्याअभावी बस येत नव्हती. त्यामुळे चक्क एका पिढीने पायीच शिक्षण घेतले; परंतु आता चांगला रस्ता झाल्यानंतर गावातील मुले व मुली जरंडी येथे शाळेत जाण्या-येण्यासाठी दररोज आठ कि़मी. पायपीट करीत आहेत.
सोयगाव तालुका डोंगराळ, मागास, जिल्हा मुख्यालयापासून सर्वात लांब असलेला तालुका. येथील भूमिपुत्र माजी मंत्री कै. बाबूरावजी काळे यांच्या प्रयत्नाने सोयगावला एस.टी. आगार सुरू झाले; परंतु तालुक्यातील काळदरी, दस्तापूर, माळेगाव-प्रिंपी या गावात अद्याप एस.टी. पोहोचलेली नाही. यात काळदरी, दस्तापूर ही गावे दूर आहेत; परंतु फर्दापूर, चाळीसगाव राज्य रस्त्यापासून केवळ ४ कि़मी. अंतरावर व सोयगाव आगारापासून केवळ १५ कि़मी. दूर असलेल्या माळेगाव-पिंप्री या गावात अद्याप बससेवा नाही. गावातील मुले-मुली माध्यमिक शिक्षणासाठी जरंडी येथे जातात. आतापर्यंत गावाला चांगला रस्ता नव्हता, त्यामुळे बस येत नव्हती, म्हणून एका पिढीने पायीच शिक्षण घेतले. खाजगी वाहने, रिक्षा व दुचाक्यांमुळे गावकरी आपली कामे करण्यासाठी बाहेरगावी जातात; परंतु गावातील ५२ मुले व मुली आजही जरंडी येथे शाळेत जाण्यासाठी चार व परत येण्यासाठी चार अशी दररोज आठ कि़मी. पायपीट करतात. गावात जाण्यासाठी आता डांबरी रस्ता झाला तरीही बस सुरू होत नाही. याविषयी सोयगावचे आगार व्यवस्थापक सचिन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता सदरील गावात अद्याप बस गेलेली नाही. त्यामुळे रुट सर्व्हे झाल्याशिवाय बस सुरू करता येणार नाही. प्रस्ताव पाठविलेला आहे, असे ते म्हणाले.
रुट सर्व्हे होऊनही दस्तापूर-काळदरीला बस मिळाली नाही. एस.टी. महामंडळाच्या या रुट सर्व्हेचा पूर्वानुभव फारसा चांगला नाही. काळदरी, दस्तापूर ते किन्ही या रस्त्यावर बस सुरू करण्यासाठी वर्षभरापूर्वीच हा रुट सर्व्हे करण्यात आलेला आहे.