ST Strike: २४ तासांत हजर व्हा ! सेवा समाप्तीच्या नोटिसीने नव्या कर्मचाऱ्यांना धडकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 15:08 IST2021-11-18T15:07:38+5:302021-11-18T15:08:02+5:30
ST Strike: नोटिसा बजावल्या असल्या तरी वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पाठबळामुळे संपात सहभागी राहण्यावर कर्मचारी ठाम राहणार असल्याचे समजते.

ST Strike: २४ तासांत हजर व्हा ! सेवा समाप्तीच्या नोटिसीने नव्या कर्मचाऱ्यांना धडकी
औरंगाबाद : एसटी महामंडळातील (ST Strike) रोजंदारीवरील नव्या कर्मचाऱ्यांना म्हणजे ‘चालक तथा वाहक’ या पदावरील कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे संपात सहभागी झाल्यावरून सेवा समाप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आगारातील फलकांवर प्रत्येक कर्मचाऱ्याची नोटीस चिटकविण्यात आली आहे. परिणामी, नव्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप दहाव्या दिवशी, बुधवारीदेखील सुरू राहिला. दररोज बसस्थानकात, आंदोलनस्थळी यायचे आणि सायंकाळी जायचे, असा संपकरी कर्मचाऱ्यांचा दिनक्रम सुरू आहे. संपात सहभागी झालेल्या चालक तथा वाहकांनी २४ तासांच्या आत कर्तव्यावर हजर होण्याची सूचना नाेटिसीद्वारे देण्यात आली आहे. रुजू न झाल्यास सेवा समाप्त करण्यात येईल, असा इशाराच महामंडळाने दिला आहे. एकट्या मध्यवर्ती बसस्थानकातील ४४ कर्मचाऱ्यांना अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटिसा बजावल्या असल्या तरी वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पाठबळामुळे संपात सहभागी राहण्यावर कर्मचारी ठाम राहणार असल्याचे समजते. संपातून कोणी बाहेर पडणार नाही, याची खबरदारी काही जणांकडून घेतली जात आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून यापुढे काय पाऊल उचलले जाते, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दहा दिवसांत पाच कोटींचे नुकसान
औरंगाबाद विभागात गेल्या दहा दिवसांत संपामुळे तब्बल पाच कोटींच्या उत्पन्नावर पाणी फेरले गेले आहे. जिल्ह्यातील सर्व आठ आगारांमधील बसेस जागेवरच उभ्या आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत आठ खासगी शिवशाही बसमधून ३०५ प्रवासी पुण्याला गेले.