‘एस.टी.’ चा प्रवास आजपासून महागणार

By Admin | Updated: August 22, 2014 00:19 IST2014-08-22T00:14:30+5:302014-08-22T00:19:53+5:30

औरंगाबाद : ‘आपोआप भाडेवाढ ’ या सूत्रात अंतर्भूत असणाऱ्या डिझेलच्या दरवाढीचा फटका २२ आॅगस्टपासून पुन्हा एकदा एसटी प्रवाशांच्या खिशाला बसणार आहे.

'ST' journey will be expensive from today | ‘एस.टी.’ चा प्रवास आजपासून महागणार

‘एस.टी.’ चा प्रवास आजपासून महागणार

औरंगाबाद : ‘आपोआप भाडेवाढ ’ या सूत्रात अंतर्भूत असणाऱ्या डिझेलच्या दरवाढीचा फटका २२ आॅगस्टपासून पुन्हा एकदा एसटी प्रवाशांच्या खिशाला बसणार आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे राज्य परिवहन महामंडळाने प्रवास भाड्यात सरासरी ०.८० टक्का दरवाढ जाहीर केली आहे. २०१४ या वर्षात चौथ्यांदा एसटी महामंडळाने भाडेवाढ केली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना किमान एक रुपयांपासून जवळपास ९ रुपयांपर्यंत भाडेवाढीचा फटका बसणार आहे.
डिझेलच्या दरात सतत होणाऱ्या दरवाढीमुळे प्रवास भाड्यात वाढ करणे भाग पडत असल्याचे राज्य परिवहन महामंडळाकडून सांगितले जाते. यामुळे गेल्या २१ दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. साध्या, जलद, रात्रसेवा आणि निमआराम सेवेत प्रतिसहा कि. मी. साठी ५ पैसे अशी दरवाढ केली आहे. साध्या, जलद सेवेच्या पहिल्या २७ कि. मी. च्या प्रवासासाठी मात्र दरवाढ करण्यात आलेली नाही. २२ आॅगस्टपूर्वी आगाऊ आरक्षण केलेल्या आणि २२ आॅगस्ट रोजी अथवा त्यानंतर प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांकडून प्रवासाच्या वेळी फरक वसूल केला जाईल. परंतु ज्या प्रवाशांचा प्रवास २१ आॅगस्ट रोजी सुरू होऊन २२ आॅगस्ट अथवा त्यानंतर संपणार असेल अशा प्रवाशांकडून फरक वसूल केला जाणार नाही. सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाची बससेवा महत्त्वाची ठरते. सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासामुळे एसटी बसेसला सर्वसामान्यांकडून प्राधान्य दिले जाते. सातत्याने होणाऱ्या भाडेवाढीविषयी प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
एसटी महामंडळाने ३१ जुलै रोजी ०.८१ टक्क्याने भाडेवाढ केली होती. त्यानंतर डिझेलच्या दरात झालेली दरवाढ लक्षात घेऊन २२ आॅगस्टपासून पुन्हा दरवाढ करण्याचे जाहीर केले आहे.

Web Title: 'ST' journey will be expensive from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.