एसटी वाहक-चालकाचा प्रामाणिकपणा

By Admin | Updated: August 17, 2014 01:45 IST2014-08-17T01:34:00+5:302014-08-17T01:45:07+5:30

एसटी वाहक-चालकाचा प्रामाणिकपणा

ST carrier-driver's honesty | एसटी वाहक-चालकाचा प्रामाणिकपणा

एसटी वाहक-चालकाचा प्रामाणिकपणा

औरंगाबाद : पत्नीच्या उपचारासाठी नातेवाईकांकडून जमा करून आणलेले ५५ हजार रुपये एका बॅगमध्ये ठेवलेले असताना ती बॅग एका प्रवाशाकडून चुकून बऱ्हाणपूर-औरंगाबाद बसमध्येच राहिली; परंतु एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानकातील वाहक-चालकांनी सतर्क राहून सदर बॅग आगारात जमा करून प्रामाणिकपणा दाखविला.
बऱ्हाणपूर-औरंगाबाद बसचे चालक सिद्धार्थ गणपत गायकवाड आणि वाहक विजय पांडुरंग जाधव अशी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. बऱ्हाणपूर-औरंगाबाद बस शुक्रवारी दुपारी जळगाव येथे आल्यानंतर येथे चालक-वाहक आगारात नोंद करण्यासाठी गेले. नोंद करून जळगावपासून दहा कि.मी. अंतरावर गेल्यावर चालकाच्या पाठीमागील सीटवर बेवारस बॅग असल्याचे वाहक विजय जाधव यांच्या लक्षात आले. ही बाब त्यांनी चालक सिद्धार्थ गायकवाड यांच्या लक्षात आणून दिली. यावेळी बॅगविषयी प्रवाशांकडे विचारणा करण्यात आली; परंतु बॅग कोणाची आहे, याविषयी माहिती न मिळाल्याने दोघांनीही ही बाब आगार व्यवस्थापक प्रताप जाधव यांना दिली. यावेळी वाहक-चालकांनी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये रोख रक्कम असल्याचे आढळले. दरम्यान, ज्या प्रवाशाची ही बॅग होती त्याने जळगाव आगारात बसमध्ये बॅग राहिल्याबाबत तात्काळ माहिती दिली. त्यानंतर चालक-वाहकांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी ही बॅग मध्यवर्ती बसस्थानकात जमा केली. यावेळी ओळख पटल्यानंतर बॅग सदर वरिष्ठ आगार व्यवस्थापक प्रताप जाधव यांनी प्रवाशाच्या नातेवाईकाला दिली. संशयित वस्तूबाबत सतर्क राहणारे आणि प्रामाणिकपणा दाखविणारे चालक सिद्धार्थ गायकवाड आणि वाहक विजय जाधव यांचा शनिवारी प्रताप जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रशिक्षणाचा फायदा
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना नुकतेच संशयित वस्तूंबाबत कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. आपणही हे प्रशिक्षण घेतले आहे.
संशयित वस्तूंबाबत तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती दिली जाते. बसमध्ये बेवारस बॅग असल्याने काही वेळेसाठी भीती वाटली; मात्र बॉम्बसदृश बॅग कशी असू शकते, याची माहिती असल्याने योग्य काळजी घेतल्याचे चालक सिद्धार्थ गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: ST carrier-driver's honesty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.