छत्रपती संभाजीनगर : प्रवासी घेऊन निघालेल्या एस.टी. बसचे ब्रेक फेल होऊन बस अनियंत्रित झाली. बुधवारी सायंकाळी ६:३० वाजता मिल कॉर्नर चौकात ही घटना घडली.
एस.टी. महामंडळाची छत्रपती संभाजीनगर ते दिगाव बस (एम.एच. २़० -बी. एल. २३२१) चालक सायंकाळी प्रवासी घेऊन बसस्थानकामधून बाहेर पडला. मिल कॉर्नर चौकात सिग्नल सुटताच बस अनियंत्रित झाली व समोरील एका कारला धडक दिली. बस व कारच्या जोराच्या धडकेने समोरील दोन रिक्षा, दोन दुचाकींना धडक बसून वाहनांचे मोठे नुकसान झाले.
वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे जाधव यांनी सांगितले.