वातावरण बदलाने गव्हासह ज्वारीवर पहिल्यांदाच फवारणीची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 07:02 PM2019-12-27T19:02:39+5:302019-12-27T19:05:39+5:30

जिल्ह्यात १ लाख २० हजार हेक्टरवर रबीची पेरणी

Spraying for the first time on tide with wheat due to climate change | वातावरण बदलाने गव्हासह ज्वारीवर पहिल्यांदाच फवारणीची पाळी

वातावरण बदलाने गव्हासह ज्वारीवर पहिल्यांदाच फवारणीची पाळी

googlenewsNext
ठळक मुद्देवातावरण बदलाचा शेतीवर परिणाम  मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव

औरंगाबाद : जिल्ह्यात रबीची १ लाख २० हजार हेक्टरवर  पेरणी झाली आहे. खरिपामध्ये लष्करी अळीने मका खाल्ला होता. रबीतही मक्यावर पुन्हा त्याच अळीने प्रादुर्भाव करणे सुरू केले आहे, तर ज्वारी व गव्हावर खोडमाशी आढळून आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

जिल्ह्यात रबी पेरणीचे क्षेत्र सरासरी २ लाख ८ हजार १८८  हेक्टर आहे. त्यापैकी आजपर्यंत १ लाख २० हजार ९७३ हेक्टरवर (५८.११ टक्के) पेरणी झाली आहे. खरिपात मक्यावर लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांनी यापासून धडा घेऊन पीक पद्धत बदलणे आवश्यक होते; पण रबीत पुन्हा शेतकऱ्यांनी ११,५१६ हेक्टरवर मक्याची लागवड केली. ती सरासरीपेक्षा २४ टक्के जास्त झाली आहे, तर १ लाख १० हजार ७९३ हेक्टरपैकी ३० हजार १६६ हेक्टरवर ज्वारीचा पेरा झाला आहे, तर ४५ हजार ४०४ हेक्टरवर गव्हाचा पेरा झाला आहे. ज्वारीची पेरणी २७.२३ टक्के, तर गव्हाची पेरणी ११८.५५ टक्के झाली आहे.  

खरिपात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने धुमाकूळ घातला होता. परिणामी, रबीत पीक पद्धतीत बदल करणे अपेक्षित होते; पण जिल्ह्यात सरासरीपेक्षा १२४.७० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. विशेषत: जिल्ह्याच्या उत्तरेकडील फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, कन्नड या तालुक्यांत मका जास्त लावण्यात येतो. या मक्यावर काही प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. थंडीमुळेही नैसर्गिकरीत्या अळीवर नियंत्रण येत असते. मात्र, ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस व थंडीचे प्रमाण कमी, यामुळे गव्हाची वाढ खुंटते की काय, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. कारण, थंडीमुळेचे ओंबीत दाणे भरले जातात. सध्या गव्हाचे पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. यामुळे काही भागात गव्हावर खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. 

आणखी चार दिवस ढगाळ वातावरण राहील व त्यानंतर थंडी पडेल. हिवाळा संपल्यानंतरही थंडी काही दिवस लांबण्याची चिन्हे आहेत. थंडी वाढल्यावर नैसर्गिकरीत्या कीड व अळीवर नियंत्रण येते. तोपर्यंत कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी फवारणी करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला. रबीत अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच गहू, ज्वारीवर फवारणी करण्याची वेळ आल्याचे शेतकरी बाबूराव शेळके यांनी सांगितले. 

एक पीक पद्धत बदलावी 
सातत्याने एक पीक घेण्यात येते. खरिपात मका घेतला, तर रबीत दुसरे पीक घ्यावे; पण तसे होत नाही. यामुळे खरिपात आलेली लष्करी अळी पुन्हा सक्रिय होते. कपाशीच्या बाबतीतही तसेच आहे. खरिपात कपाशीवर आढळून येणारी बोंडअळी सुमारे १२६ गवतवर्गीय पिकांवरही प्रादुर्भाव करू शकते. याचा विचार करून शेतकऱ्यांनी एक पीक पद्धत टाळावी, सातत्याने पीक पद्धतीत बदल केला पाहिजे. गावात एकाच वेळी सर्वांनी पेरणी करावी. एकात्मिक कीड नियंत्रण करावे. यामुळे काही प्रमाणात अळी, किडीवर नियंत्रण मिळवता येईल. 
- उदय देवळाणकर, विभागीय सांख्यिक (कृषी विभाग)

निंबोळी अर्काची फवारणी करावी
गहू असो वा उशिरा पेरण्यात आलेल्या ज्वारी पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात जाणवत आहे. सध्या दररोज बरेच शेतकरी बांधव या पीक समस्यांबाबत विचारणा करीत आहेत. सध्या ज्वारी पिकावरदेखील काही ठिकाणी प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी सर्वप्रथम निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्याचा परिणाम झाला नाही, तर कृषितज्ज्ञांशी संपर्क साधावा. गव्हावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून येत असल्यामुळे शिफारशीनुसार कीटकनाशकाची फवारणी करावी. 
- रामेश्वर ठोंबरे, कृषी सहायक, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र

Web Title: Spraying for the first time on tide with wheat due to climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.