क्रीडा खात्याला अखेर कारभारी मिळाला
By Admin | Updated: October 27, 2015 00:25 IST2015-10-27T00:12:09+5:302015-10-27T00:25:58+5:30
लातूर : गेल्या दीड महिन्यांपासून बेवारस असलेल्या क्रीडा खात्याला अखेर अतिरिक्त स्वरुपात का होईना पदभार मिळाला आहे़ नांदेड येथे असलेले जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे

क्रीडा खात्याला अखेर कारभारी मिळाला
लातूर : गेल्या दीड महिन्यांपासून बेवारस असलेल्या क्रीडा खात्याला अखेर अतिरिक्त स्वरुपात का होईना पदभार मिळाला आहे़ नांदेड येथे असलेले जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांच्याकडे लातूर जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार मिळाला आहे़ त्यामुळे काही अंशी का होईना लातूरच्या क्रीडा खात्याचा प्रश्न मिटला आहे़
गेल्या दीड महिन्यांपासून लातूरच्या क्र्रीडा खात्याला कोणी वाली नव्हता़ याचे ना शासनाला देणे-घेणे ना प्रशासनाला़ यामुळे लातूरच्या क्रीड खात्याची चांगलीच गोची झाली होती़ ऐन स्पर्धेच्या मोसमात प्रमुख अधिकारी नसल्याने लातूरच्या क्रीडा खात्याची दैना अवस्था झाली होती़ विनाकारभारीच जिल्हा व विभागीय क्रीडा स्पर्धा संयोजकाला पार पाडाव्या लागल्या़ गेल्या तीन महिन्यांपासून क्रीडा कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन स्वाक्षरीअभावी थकले आहे़ याबाबत ‘लोकमत’ने अनेक वेळा बातम्यांद्वारे प्रकाश टाकला होता़ अखेर प्रशासनाला जाग आली असून, सोमवारी सायंकाळी याबाबतचे पत्र लातूर जिल्हा क्रीडा कार्यालयाला प्राप्त झाले आहे़ त्यानुसार नांदेड येथे पूर्णवेळ असलेले अनंत बोबडे यांना लातूरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे़ त्यामुळे लातूरच्या क्रीडा खात्याचा प्रश्न तात्पूरत्या स्वरुपात का होईना मिटला आहे़ लातूरच्या क्रीडा संकुलात अनेक समस्या आहेत़ यासह नव्याने होणारे विभागीय क्रीडा संकुल व खेळाडुंच्या हिताच्या अनेक बाबी अशी आव्हाने नवीन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे आहेत़ तात्पूरत्या स्वरुपात का होईना जिल्हा क्रीडा अधिकारी मिळाल्याने लातूरच्या क्रीडा क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे़ (क्र्रीडा प्रतिनिधी)
अनेकांची होती फिल्डींग़़़
४तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी आऱडी़ माहादावाड यांची औरंगाबाद येथे क्रीडा उपसंचालक म्हणून पदोन्नती झाल्याने लातूरचे पद अनेक दिवस रिक्त होते़ यासाठी जिल्ह्यातील अनेक क्रीडा अधिकाऱ्यांनी आपल्या कुवतीनुसार पुण्याच्या कार्यालयाकडे तसेच शासनाकडे फिल्डींग लावली होती़ अनेकजण यासाठी बाशिंग बांधूनही तयार होते़ मात्र लातूरच्या या पदाचा पदभार नांदेडच्या अनंत बोबडे यांच्याकडे देण्यात आला आहे़