आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी विशेष रेल्वेगाडी!
By Admin | Updated: June 26, 2014 01:00 IST2014-06-26T00:55:01+5:302014-06-26T01:00:04+5:30
स. सो. खंडाळकर, औरंगाबाद मागील वर्षाप्रमाणेच याही वर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात येणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी विशेष रेल्वेगाडी!
स. सो. खंडाळकर, औरंगाबाद
मागील वर्षाप्रमाणेच याही वर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात येणार आहे. गतवर्षी या रेल्वेगाडीला पांडुरंगाच्या भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला होता.
यंदा ७ व ८ जुलै रोजी ही रेल्वेगाडी औरंगाबादहून सोडण्यात यावी व पुन्हा परतीसाठी ती ९ व १० जुलै रोजी पंढरपूरहून सुटावी, अशी मागणी होत आहे. रेल्वेचे वरिष्ठ यातायात प्रबंधक मलेश्वरराव व उपमुख्य परिवहन प्रबंधक अरुण राठोड यांच्याशी मराठवाडा रेल्वे विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच सिकंदराबाद येथे चर्चा केली. त्यावेळी पंढरपूरसाठी लवकरच विशेष रेल्वेगाडी सुरू करण्याचे जाहीर करण्यात येईल, असे ठरले.
रोटेगाव- पुणतांबा या २५ कि.मी.च्या रखडलेल्या कामास गती देण्यात यावी व सोलापूर- तुळजापूर- उस्मानाबाद- कुंथलगिरी- बीड- गेवराई- पैठण- औरंगाबाद- घृष्णेश्वर- सिल्लोड- अजिंठा- जळगाव या रेल्वेमार्गाला गती देण्यात यावी, पुणे- अहमदनगर- औरंगाबाद- कन्नड- चाळीसगाव या नवीन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यात यावे, नांदेड विभाग मध्य रेल्वेशी जोडण्यात यावा आदी मागण्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्या असता त्यांनी त्यावर रिमार्क कयन आपल्या सचिवांकडे दिल्या. मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा हे याबाबतीत परिश्रम घेत आहेत.
अमरनाथ यात्रेसाठीही २८ जून ते ३१ आॅगस्टपर्यंत आठवड्यातून एकदा विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.
यासंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेने कोणतेच पाऊल उचलले नाही. याबाबतीत रेल्वे बोर्डाने अद्याप अनुमती दिलेली दिसत नाही, तसेच नांदेड- औरंगाबाद- मनमाड- जळगाव- सूरत- बडोदा- अहमदाबाद- आबूरोड- पालिथाना- मारवाड- जोधपूर- गोठण- मेडता- बिकानेर रेल्वे सुरू करण्यासही रेल्वे बोर्डाने अद्याप अनुमती न दिल्याने असंतोष वाढत आहे.