विशेष व्यक्तींना न्याय मिळेना
By Admin | Updated: January 15, 2016 00:16 IST2016-01-14T23:49:46+5:302016-01-15T00:16:20+5:30
औरंगाबाद : विशेष व्यक्तींसाठी ज्याप्रमाणे कामे व्हायला हवीत, तशी होत नाहीत. या व्यक्तींसाठी असलेल्या संबंधित विभागांमधील अधिकारीही सामाजिक जबाबदारीपेक्षा नोकरी म्हणूनच काम करीत आहेत.

विशेष व्यक्तींना न्याय मिळेना
औरंगाबाद : विशेष व्यक्तींसाठी ज्याप्रमाणे कामे व्हायला हवीत, तशी होत नाहीत. या व्यक्तींसाठी असलेल्या संबंधित विभागांमधील अधिकारीही सामाजिक जबाबदारीपेक्षा नोकरी म्हणूनच काम करीत आहेत. त्यामुळे योजना असूनही विशेष व्यक्तींपर्यंत पोहोचत नाही, त्याचा त्यांना योग्य लाभ मिळत नाही आणि न्याय दिला जात नाही, असा खेद सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला.
शहरातील बीड बायपास येथील लॉन्सवर आयोजित साहित्य व सांस्कृतिक मंडळ, पुणे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई (अपंग हक्क विकास मंच) यांच्या वतीने आयोजित ६ व्या अखिल भारतीय विशेष व्यक्तींच्या (अपंग) संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी विशेष सत्रात ते बोलत होते. यावेळी खा. सुप्रिया सुळे, माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, आ. हेमंत टकले, दीपा क्षीरसागर, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, स्वागताध्यक्ष सुहास तेंडुलकर, विजय कान्हेकर, डॉ. रवींद्र नांदेडकर, नीलेश राऊत, सचिन मुळे यांची उपस्थिती होती.
संमेलनातील ठराव :
१) केेंद्रशासनाच्या धर्तीवर राज्यात अपंगाची वेगळी रचना करावी. २) अपंग धोरणाची अंमलबजावणी करावी. ३) विशेष व्यक्तीतील साहित्यिकांची स्वतंत्र नोंदणी करावी.
पुरस्कार वितरण
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे वितरण शिवाजी गाडे व धर्मेंद्र सातव यांना करण्यात आले. संस्कार ग्रुप (पुणे) यांच्यातर्फे संस्कारभूषण पुरस्कार पीयूष द्विवेदी (साहित्य), गजानन वाघ (प्रशासकीय सेवा), कोमल बोरा (क्रीडा), चेतना अपंग मती विकास संस्था यांना देण्यात आला. तसेच तारामती बाफना अंध विद्यालय (औरंगाबाद) यांना अंधांसाठी उपयुक्त असणाऱ्या ब्रेन लिपीतील पुस्तकांची भेट देण्यात आली. यानंतर खंडेराव मुळे, राजेश ठाकरे, परिमल भट्ट, पवन खेबुडकर यांच्या यशोगाथेविषयी प्रकट मुलाखती घेण्यात आल्या.
वर्षभर तरी गोड बोला
सुप्रिया सुळे म्हणाल्या, नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. संक्रांतीचा सण आहे. आता काही निवडणुकाही नाहीत. तेव्हा सरकारने तीळगुळ घेऊन वर्षभर तरी गोड बोलावे, हे राजकीय व्यासपीठ नाही, असे म्हणत शुभेच्छा दिल्या.