मग्रारोहयो कामांची होणार विशेष पाहणी

By Admin | Updated: January 6, 2015 01:06 IST2015-01-06T00:57:24+5:302015-01-06T01:06:56+5:30

जालना : मग्रारोहयो कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्याने या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या आहेत

Special inspection will be done for the Magarohio activities | मग्रारोहयो कामांची होणार विशेष पाहणी

मग्रारोहयो कामांची होणार विशेष पाहणी


जालना : मग्रारोहयो कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्याने या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दहा ग्रामपंचायती मिळून एक नरेगा क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात मागील काही काळात मग्रारोहयोच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत. जिल्हा परिषदेअंतर्गत झालेल्या काही कामांची तपासणीही झालेली आहे. कोट्यवधी रूपये या कामांसाठी दिले जात असताना त्यामध्ये पारदर्शीपणा राहत नसल्याने काही ठिकाणी चांगली कामे झाले असतील, तेथेही शंका निर्माण होत असे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दहा ग्रामपंचायती मिळून एक नरेगा क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. यात जिल्हाधिकारी नायक म्हणाले की, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता कामाची मागणी आल्यानंतर त्या कामगाराला १५ दिवसांत काम देणे बंधनकारक आहे.
काम दिल्यानंतर हजरी रजिस्टर भरून घेणे, कामाची बिले वेळेवर अदा करणे, व्हावचर व्यवस्थित ठेवणे, बांधकामासाठी आलेले अनुदान वेळेत खर्च करणे, २६ जानेवारी २०१५ रोजी सर्व ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन उर्वरीत कामे पूर्ण करून शंभर टक्के उद्दिष्टय साध्य करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी नायक यांनी दिल्या.
ज्या विभागाकडे काम करण्यासाठी यंत्रणा कमी पडत असेल त्यांनी रिक्त पदे भरण्यासाठी व कंत्राटी पद्धतीने काही कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.
गटविकास अधिकारी, तहसीलदार यांनी कामाचे नियोजन करून आठवड्यातून एकदा चालू कामांना भेट देणे, पाझर तलावासंदर्भात किंवा इतर कामाच्या काही तक्रारी असेल त्या लवकर निकाली काढाव्यात.
तसेच दुष्काळाची भयावह दृष्य पाहता येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत जेसीबी, पोकलेन व ट्रॅक्टरच्या सहाय्याने गाळ काढून घेणे म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यात पडणारे पाणी जास्त प्रमाणात साठवता येईल आणि येणाऱ्या काळात दुष्काळाची झळ काही कमी प्रमाणात होईल, असेही जिल्हाधिकारी नायक यांनी सांगितले.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. एन.आर. शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी उमेश घाडगे यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. कमी होणाऱ्या पर्जन्यमानाचे प्रमाण लक्षात घेता पडलेल्या पावसाचे पाणी कशाप्रकारे जास्तीत जास्त साठविता येईल, यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्याची सूचनाही जिल्हाधिकारी नायक यांनी यावेळी केली.
४जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करून पाणीटंचाईसदृश्य परिस्थितीशी मुकाबला करता येईल, याचा कृती आराखडा तयार आखून शिवार बैठका घेऊन जलसंवर्धनाबाबत गावागावातून जागृती निर्माण करून पाण्याचे महत्व पटवून द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.

Web Title: Special inspection will be done for the Magarohio activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.